मुक्तपीठ टीम
कोरोना संकटात जगभरातील डॉक्टर, नर्स अन्य आरोग्य रक्षक रुग्णांची मनापासून सेवा करत आहेत. सेवाभावातून सुचलेल्या एका वेगळ्या कल्पनेमुळे ब्राझिलमधील एक नर्स सध्या चर्चेत आली आहे. त्या नर्सने एका कोरोना रुग्णाला त्याच्या प्रियजनांबरोबर असल्याची भावना जाणवण्यासाठी भन्नाट डोकं लढवलं. या नर्सने दोन ग्लोव्ह्जमध्ये कोमट पाणी भरले. ते एकत्र बांधले आणि रुग्णाच्या हातात ठेवले. ज्याच्या जवळ त्याचे कोणीही नाही. हे ग्लोव्ह्ज हातात घेतल्यावर रुग्णाला खरे हात हातात घेतल्यासारखा उबदार स्पर्श जाणवतो. स्वाभाविकच त्याला उभारी मिळते. कोरोनाच्या संसर्गजन्यतेमुळे रोगाशी एकाकी लढावं लागतं. पण या नर्सच्या सोप्या उपायामुळे त्या एकाकीपणावर उबदार साथीच्या जाणीवेतून मात करण्याचा मार्ग मिळत आहे.
ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच या नर्सचे खूप कौतुक होत आहे. समीर भट्ट यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन नर्सची माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे – “देवाचा हात – ब्राझीलच्या कोरोना आयसोलेशन वॉर्डात एकाकी पडलेल्या रूग्णांना दिलासा देण्यासाठी नर्सने केलेला प्रयत्न”. ही बातमी देण्यामागची मुक्तपीठची अपेक्षा हीच आहे की भारतातही अशा कल्पनांवर काम करता येईल. मनाला उभारी मिळण्यातून रोगाशी लढण्याचं बळ अधिकच वाढेल!
पाहा व्हिडीओ: