मुक्तपीठ टीम
हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. मात्र, अन्य सहआरोपी मनीष दळवी यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने मंजूर केला. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे हल्लेखोरांच्या संपर्कात असल्याचा आणि हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप आहे. त्यानंतर आता कोर्टाने त्यांना धक्का दिला आहे. नितेश राणे हे संतोष परब यांच्यावरील या प्रकरणी सत्र न्यायालयाच्या पाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज नाकारत त्यांना धक्का दिला आहे.
या प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर राणे यांनी यापूर्वी ४ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर मारहाण केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ डिसेंबर २०२१ रोजी शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांना मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांनी मारहाण केल्यावर नितेश राणे यांचे नाव घेतले असे संतोष परब यांनी तक्रार करत पोलिसांना ही माहिती दिली आहे.
राणेंच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या आदेशाला दोन आठवड्यांची स्थगिती देण्याची मागणी केली आहे. त्याबाबत उच्च न्यायालय निर्णय घेणार आहे.
संतोष परब वय ४४ वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरून राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणकवलीतील नरवडे नाका येथून दुचाकीवरून जात असताना नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने त्यांच्या मोटारसायकलला धडक देऊन ५० फूट फरफटत नेले, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर हल्लेखोराने सतीश सावंत याच्यासोबत काम केल्याबद्दल त्याला परत जाण्याची धमकी दिली. अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली.