मुक्तपीठ टीम
लशींचा तुटवडा लक्षात घेऊन मुंबई मनपाने ५० लाख लशींची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी येत्या दोन दिवसात जागतिक निविदा मागविण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांना दिली.
मुंबईत आतापर्यंत २७ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. दुसऱ्या डोस घेणाऱ्यांचे प्रमाण सात लाख एवढे आहे. लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा १ मे पासून सुरू झाला असून यात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. परंतु लशींचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहिम संथ गतीने होत आहे. तर काही वेळा लसीकरण केंद्र बंद करण्यात येते. या पाश्वभूमीवर पालिकेने स्वत: जागतिक निविदा काढून ५० लाख डोस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या कारणांमुळे घेतला लस खरेदीचा निर्णय
- लशींचा साठा उपलब्ध होत नसल्याने पालिकेला वेळोवेळी नियम बदलावे लागत आहेत.
- त्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार आहे.
- या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी किमान ६० लाख नागरिकांना लस मिळणे गरजेचे आहे.
- त्यानुसार पुढील ८० दिवसांत या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान मंबई मनपापुढे आहे.
- त्यामुळेच लस खरेदी करण्यात येत असल्याचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्व पक्षीय गटनेत्यांना सांगितले .
या चार लसींचा वापरांचा विचार
- जॉन्सन अॅण्ड जॉन्सन
- स्पुटनिक
- फायझर
- मॉर्डना
- या कंपन्यांच्या करोना प्रतिबंधक लशींना मान्यता मिळाली आहे.
- यापैकी कोणती कंपनी मुंबईकरांसाठी लस उपलब्ध करेल हे जागतिक निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होईल.
- यासाठी येणारा खर्च आरोग्यासाठी राखून ठेवलेल्या निधीतून करण्यात येईल.
- लस मिळाल्यानंतर मुंबईकरांचे लसीकरण जलदगतीने पूर्ण होऊ शकेल, असा विश्वास या अधिकाऱ्याने व्यक्त केला.