मुक्तपीठ टीम
मुंबई हे महानगर जवळपास दीड कोटी लोकसंख्येचं. रोज कामानिमित्त मुंबईत येणाऱ्यांची संख्या आणखी जास्त. एकीकडे या लोकसंख्येच्या गरजा भागवण्याचं आव्हान तर दुसरीकडे नैसर्गिक किंवा अन्य आपत्तींच्या वेळी एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या सुरक्षेचाही प्रश्न. हे सारं आव्हानात्मकच. त्यामुळेच मुंबई मनपाने आता मुंबईकरांसाठी एक अॅप लाँच केले आहे. मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, मोबाइलच्या प्ले स्टोअरवरून Disaster Management MCGM अॅप डाउनलोड करून लोक आपत्कालीन परिस्थितीची माहिती मिळवू शकतात. या अॅपच्या माध्यमातून मुंबईतील पाऊस, भौगोलिक परिस्थिती, आपत्कालीन परिस्थितीत कोणाशी संपर्क साधावा आदी सर्व माहिती फोन क्रमांकासह उपलब्ध होणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.
कसे अलर्ट करणार मुंबई मनपाचे Disaster Management MCGM अॅप?
- या अॅपवर मुंबई शहर आणि उपनगरातील पावसाच्या परिस्थितीचे अपडेट्स दर १५ मिनिटांनी मिळतील.
- मुंबईच्या कोणत्या भागात किती पाऊस पडतोय, वारा किती आहे, याचीही माहिती मिळेल.
- समुद्रात ४.५ मीटर उंच भरती, मुसळधार पाऊस आणि मुसळधार पावसाची वेळ कधी येईल? अॅपवरील सूचनांद्वारे ही माहिती मिळत राहील.
- कुलाबा आणि अंधेरी येथे असलेल्या भारतीय हवामान विभागाच्या दोन्ही डॉप्लर रडारवरून हवामानाची माहिती कायम मिळत राहील.
- उपग्रह प्रतिमा देखील उपलब्ध असतील.
- रस्त्यावर पाणी साचल्यास वाहतुकीचा उपाय उपलब्ध होईल, जेणेकरून लोकांना गर्दीमध्ये अडकणे टाळता येईल.
- विमानतळावरील विमानांच्या हालचालींवर होणाऱ्या परिणामाची माहितीही अॅपवर उपलब्ध असेल.
- कोणत्या भागात किती पाणी साचले आहे, कुठे दरड कोसळण्याची शक्यता आहे, कोणती इमारत धोकादायक आहे, याचीही माहिती मिळेल.
आपत्ती उद्भवलीच तर कसे उपयोगी ठरणार Disaster Management MCGM अॅप?
- आपत्कालीन परिस्थितीत मी कुठे आश्रय घेऊ शकतो? यामध्ये बीएमसी शाळा आणि संक्रमण शिबिराचीही माहिती मिळणार.
- मोबाइल अॅपवर ‘एसओएस’ची विशेष सुविधा उपलब्ध होणार आहे. -या अॅपमध्ये लोक त्यांच्या जवळच्या व्यक्तींचा नंबर सेव्ह करू शकतील.
- आपत्कालीन परिस्थितीत, अॅपवर असलेल्या फिचर्सवर क्लिक करून तुम्ही तुमच्या जवळच्या आणि प्रियजनांना कॉल करू शकता.
- या सुविधेचा लाभ घेण्यासाठी जीपीएस चालू असणे आवश्यक आहे.
- अॅपवर ‘इमर्जन्सी’ बटणाची सुविधाही असेल.
- या बटणावर क्लिक करून, ५०० मीटरच्या अंतरात असलेल्या रुग्णालय, पोलीस स्टेशन आणि BMC वॉर्ड नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून एखादी व्यक्ती मदत मिळवू शकते.
- अॅपवरील सेफ्टी टिप्स फीचर अंतर्गत २० विविध प्रकारच्या माहितीही मिळणार.