मुक्तपीठ टीम
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या रुंदणीकरणासाठी १३०० झाडांचा बळी जाण्याची शक्यता वर्तवली जात असताना, झाडे वाचविण्यासाठी पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.पूर्व द्रुतगती मार्ग ते खिंडीपाडा दरम्यानच्या ८११ झाडांवर पालिकेने पुन्हा एकदा नोटिसा लावल्या आहेत. ८११ झाडांवर नोटीसा चिकटवल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण वाद्यांनी आक्षेप घेतला आहे.
झाडे वाचवता येतील का याबाबत अभ्यास करणार…
- या रुंदीकरणाच्या कामासाठी सुमारे १३०० झाडे हटवावी लागणार आहेत.
- ही झाडे हटविण्यासाठी पालिकेने २०२० मध्येही झाडांवर नोटिसा लावल्या होत्या.
- तेव्हा लॉकडाऊन होते.
- त्यामुळे अनेक नागरिकांना या नोटीसबाबत माहिती मिळाली नसेल.
- त्यामुळे प्रत्यक्ष झाडे काढण्यापूर्वी ही नोटीस पुन्हा लावण्यात आल्याचे उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
तसेच मोठ्या संख्येने झाडे हटवावी लागणार असल्यामुळे आम्ही रस्ते व पूल विभागाला याबाबत पुन्हा एकदा आढावा घेऊन झाडे वाचवता येतील का याबाबत अभ्यास करण्यास सांगितले आहे. - त्यांच्या अहवालानंतरच याबाबत कारवाई होईल, असेही ते म्हणाले.
…तर ७४५ झाडे पुनरेपित करावी लागणार!
- गोरेगाव मुलुंड जोडरस्त्यासाठी झाडे कापण्याचा प्रस्ताव २०२० मध्ये टप्प्याटप्प्याने वृक्ष प्राधिकरणकडे येत होते.
- त्यानुसार एकूण १,३४७ झाडे काढण्याचा उल्लेख या प्रस्तावात आहे.
- त्यापैकी ऐरोली जंक्शन, पूर्व द्रुतगती मार्ग ते तानसा पाइपलाइन, खिंडीपाडा मुलुंड पश्चिम पर्यंतच्या पट्टय़ातील ८११ झाडांपैकी ६६ झाडे कापावी लागणार आहेत.
- तर ७४५ झाडे पुनरेपित करावी लागणार आहेत.
- या झाडांवर पुन्हा नोटीस लावण्यात आली आहे.
पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा जोडरस्ता!
- गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता हा पालिकेचा एक मोठा प्रकल्प असून त्यामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा जोडरस्ता मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे.
- जोडरस्त्याची लांबी १२.२ कि.मी. असून पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगांव (पूर्व ) येथील ओबेरॉय मॉल ते पूर्व द्रुतगती मार्ग, मुलुंड (पूर्व) येथील ऐरोली नाका चौकापर्यंत हा जोडरस्ता असणार आहे.
- या प्रकल्पासाठी ऐरोली जंक्शन, पूर्व द्रुतगती मार्ग ते तानसा पाइपलाइन, खिंडीपाडा मुलुंड पश्चिमेपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.