मुक्तपीठ टीम
जर, इच्छाशक्ती प्रबळ असेल तर, काहीही अशक्य नसतं. मनात काहीतरी करण्याची जिद्द असेल तर प्रत्येक आव्हानावर मात करता येते. अशीच एक घटना दिल्लीच्या रानीखेडा गावात घडली आहे. या गावात राहणाऱ्या आयुषी नावाच्या शिक्षिकेने असेच काहीसे केले आहे. दृष्टिहीन असूनही तिने केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि ४८वा क्रमांक मिळविला.
आयुषी विवाहित आहे. तिचा पती एमबीए शिकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला आहे. वडील पंजाबमधील भंटीडा येथे एका कंपनीत कामाला आहेत. तर एक भाऊ आयकर विभागात इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे.
सरकारी शाळेत आयुषी इतिहास विषय शिकवते
- आयुषी ही २९ वर्षांची आहे.
- मुबारकपूर येथील सरकारी मुलींच्या वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात इतिहास विषयाची शिक्षिका म्हणून काम करते.
- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेतील तिचा हा सहावा प्रयत्न होता.
- तिच्या परिक्षेच्या तयारीसाठी आईला नर्सिंग ऑफिसर पदावरून मुदतीपूर्वीच निवृत्त व्हावे लागले.
कुटुंबातील सदस्यांचा भक्कम पाठबळ
- घरातील सदस्य वाचन साहित्याशी संबंधित गोष्टी तिला वाचून दाखवत असत.
- यासोबतच फोनमध्ये वाचण्यासाठी योग्य सॉफ्टवेअरचाही आधार तिने घेतला. ज्यामुळे तिला तयारीला मदत झाली.
- मॉक टेस्टसाठी कोचिंग घेतले होते आणि परीक्षेशी संबंधित तयारी स्वतःच करायची.
- तिचा नंबर टॉप ५० मध्ये येईल असे तिला वाटले नव्हते. वेळेचे व्यवस्थापन हा परीक्षेच्या तयारीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.
डीएसएसबी परीक्षेमध्ये अव्वल
आयुषीने सांगितले की, २०१९ मध्ये डीएसएसबी परीक्षा इतिहास विषयातही अव्वल होती. सरकारी शाळेत कायमस्वरूपी नियुक्ती होण्यापूर्वी तिने महापालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणूनही शिकवले. त्याच वेळी, पंजाबी बाग येथील श्यामा प्रसाद मुखर्जी महाविद्यालयात पदवीच्या तीनही वर्षांमध्ये ती अव्वल होती.