मुक्तपीठ टीम
केंद्राच्या ‘अग्निपथ’ या नव्या सेना भरती योजनेबाबत देशभरात आगडोंब उसळला आहे. पंजाब, हरियाणासह देशाच्या इतर भागात या योजनेबाबत निदर्शने होत आहेत. अशा परिस्थितीत पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे सहयोगी कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केंद्र सरकारला सेना दलात भरतीसाठी नव्या ‘अग्निपथ’ योजनेचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे. सरकारला असे ‘मूलभूत’ बदल करण्याची गरज का पडली, याचे आश्चर्यही त्यांनी व्यक्त केलं आहे.
पंजाब लोक काँग्रेसचे अध्यक्ष सिंह म्हणाले की, एका सैनिकासाठी चार वर्षांची सेवा फारच कमी असते. इतके दिवस कार्यरत असलेल्या सध्याच्या नोकरभरती धोरणात बदल करण्याच्या सरकारच्या निर्णयावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. “तीन वर्षांच्या प्रभावी सेवेसह चार वर्षांसाठी सैनिकांची भरती हा सेनादलांसाठी चांगला पर्याय म्हणता येणार नाही.,” असे ते म्हणाले.
यादरम्यान त्यांनी सैन्यातील देशातील सर्व वर्गांच्या भरतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की शीख रेजिमेंट, डोग्रा रेजिमेंट, मद्रास रेजिमेंट आणि अशाच प्रकारचे त्यांचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे, जे सैन्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि ज्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. सिंह म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून या प्रणालीने चांगले काम केले आहे. याशिवाय, ते म्हणाले की, विविध सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेल्या भरतीसाठी विशिष्ट रेजिमेंटच्या वातावरणाशी जुळवून घेणे आणि तेही कमी कालावधीसाठी खूप कठीण जाईल.