मुक्तपीठ टीम
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा निकाल आज जाहीर होत आहे. त्यात भाजपाचा सर्वात आश्चर्यजनक विजय मांडला जात आहे तो उत्तराखंडमधील. तेथे गेल्या पाच वर्षात तीन मुख्यमंत्री दिलेल्या भाजपासाठी विजय अवघड मानला जात होता. एक्झिट पोलचाही सूर वेगळा नव्हता. पण निकाल जाहीर होताच उत्तराखंडच्या मतदारांनीही कमळच फुलवल्याचं दिसत आहे.
उत्तराखंडमध्ये भाजपा ४१ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस २५ आणि इतर ४ जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे तिथे स्पष्ट बहुमतासह भाजपाच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
१४ फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमध्ये ७० जागांसाठी मतदान झाले होते. एकूण ६३२ उमेदवार मैदानात उतरले होते. उत्तराखंडमध्ये अकरापर्यंत सर्वच्या सर्व जागांचे कौल हाती आले आहेत. बहुतांश जागांवर सत्ताधारी भाजपा आघाडीवर आहे. काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. बसपा तिसऱ्या स्थानी आहे.तेवढ्याच २ जागा मिळवत अपक्षही तिसऱ्या स्थानीच आहेत.
हरीश रावत यांचा पराभव
- उत्तराखंडमध्ये २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली होती.
- विशेष म्हणजे त्यावेळेस काँग्रेसचे उमेदवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री हरीश रावत यांचा दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला होता.
- उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने हरीश रावत यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उमेदवारी दिली.
- मात्र या निवडणुकीतदेखील रावत यांनाच पराभवाला सामोरे जावे लागणार असं दिसतंय. अधिकृत आकडेवारी अद्याप येणे बाकी असले तरीही काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
उत्तराखंडचा कौल
एकूण जागा ७०
- भाजपा ४८
- काँग्रेस १८
- बसपा ०२
- अपक्ष ०२
उत्तराखंडच्या मतांची साथ कुणाला कशी?
- भाजपा ४४.३९ %
- काँग्रेस ३८.१४ %
- इतर ७.९० %
- बसपा ४.८७ %
- आप ०३.४० %