मुक्तपीठ टीम
भारतीय जनता पार्टीनं २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारी आतापासून सुरु केलीआहे. भाजपा गेली अनेक वर्षे बुथवर भर देत मतदारांशी थेट संपर्कात येत असते. त्या रणनीतीनुसारच आधीच्या निवडणुकांमध्ये ज्या बुथांवर भाजपाला कमी मतदान झाले ते बुथ कमजोर म्हणून त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. अशा बुथांवर एका बुथमागे ३० कार्यकर्ते जोडण्याचं लक्ष्य ठरवण्यात आलं आहे. त्यातून आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा देशात सत्ता आणायची रणनीती ठरवण्यात आली आहे.
बुथ जिंका, देश जिंका!
- भाजपा प्रत्येक निवडणुकीचं नियोजन हे अगदी तळागाळातून मायक्रो मॅनेजमेंटने करते.
- त्यासाठी भाजपाचे पाचही वर्ष काम सुरु असतं.
- निवडणुका घोषित झाल्यावर किंवा जवळ आल्यावर जाग्या होणाऱ्या इतर पक्षांच्या तुलनेत भाजपा आधीच काम सुरु करते.
- यावेळीही २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच भाजपाने तयारी सुरु केली आहे.
- देशातील सर्वात मोठे राज्य असणाऱ्या उत्तरप्रदेशातून कमकुवत बूथ सक्षमीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
- भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नुकतीच पक्षाच्या मुख्यालयात सरचिटणीसांची बैठक घेतली.
- या बैठकीत बूथ मजबूत करण्यावर भर देण्यात आला.
कमकुवत बुथ मजबुत कसे करणार?
- या वर्षी मे महिन्यात भाजपाने उत्तरप्रदेशात पक्षासाठी ७८ हजार कमकुवत बूथ ओळखले होते.
- या प्रत्येक बुथवर किमान ३० नवीन सदस्यांना पक्षाशी जोडण्याचा निर्णयही घेण्यात आला.
- या कामासाठी केंद्रीय मंत्री तसेच लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची टीमही सहभागी झाली आहे.
- खासदारांना प्रत्येकी १०० बूथ आणि आमदारांना २५ बूथ देण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या वाट्याला राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
- भाजपच्या या कार्यक्रमाचा पहिला टप्पा ३१ ऑगस्टला संपला.
कशा पद्धतीने राबवली जाणार बुथ सक्षमीकरण मोहीम?
- खासदारांनी तैनात केलेल्या स्वयंसेवकांच्या गटाने सर्व बूथना भेट देऊन मतदारांशी संवाद साधला.
- त्यानंतर ‘सरल’ या खास सॉफ्टवेअरवर त्यांनी आपला अहवाल अपलोड केला.
- त्यानंतर हा डेटा राज्यापासून केंद्रीय स्तरावर डिजिटल पद्धतीने अपडेट केला जातो.
- सर्व राज्यांच्या बुथ डेटाचे विश्लेषण केले जाईल. त्याच्या अभ्यासानंतर त्या राज्याच्या परिस्थितीनुसार रणनीती ठरवली जाईल.