Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

भाजपाला मनसे पाहिजे, भाजपाला मनसे नको! असं का?

August 6, 2021
in featured, सरळस्पष्ट
0
BJP-MNS

तुळशीदास भोईटे/ सरळस्पष्ट

राज ठाकरे चंद्रकांत पाटील भेटतात. नाशिकच्या पार्किंगच्या मोकळ्या जागेत दोन्ही नेते चर्चा करतात. तेव्हा मिळालेल्या निमंत्रणामुळे चंद्रकांत पाटील पुन्हा मुंबईतील कृष्णकुंज निवासस्थानी राज ठाकरेंना भेटतात.

या भेटींमध्ये राजकीय चर्चा झाल्याचे सांगितले जाते. पण आमचं मनसेशी युतीचं तसं काही नाही, असं भाजपा नेते मग ते चंद्रकांत पाटील असो वा महाराष्ट्रातील भाजपाचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस सांगतात. चंद्रकांत पाटील तर मनसेच्या परप्रांतीयविरोधावर उभ्या ठाकलेल्या आक्रमक मराठीच्या मुद्द्यावर जाहीर आक्षेप नोंदवतात. आश्चर्याची बाब म्हणजे मनसेप्रमुखांकडून गैरसमज दूर करण्यासाठी ती भाषणे ऐकण्याचाही सल्ला मिळतो. ते जरी नाही म्हणतात, तरी पाटलांना राज ठाकरेंच्या भाषणाच्या त्या क्लिप मिळतात. पण आक्षेप काही दूर झाल्याचं दिसत नाही.

पुन्हा बाळा नांदगावकरांसारखा ज्येष्ठ नेते म्हणतात, “चंद्रकांत पाटील जेव्हा आले आणि गेले तेव्हा ते आनंदात होते. त्यांनी माझ्याही कानात काहीतरी सांगितले. ते मी सांगू शकत नाही. पण सगळं सकारात्मक होत. कारण आम्ही नकारात्मक विचार नाही करत. आम्ही एकटे लढत होतो, तेव्हाही सकारात्मक होतो आणि आताही आहोत.”

त्यात ते पुढे म्हणतात, “राजकारणात काय होईल हे आता सांगू शकत नाही पण राजकारणात कधीही काहीही होते, हे निश्चित आहे. मनसे भाजपा युती झाली तर आनंदच आहे”.

 

भाजपाचे आक्षेप, मनसेची क्लिप!

हे सारं जे काही घडतंय ते पाहून अनेकांना वाटू शकतं की मनसे युतीसाठी खूपच उताविळ आहे की काय? कारण भाजपाने परप्रांतियांविरोधी भूमिकेवर आक्षेप घेतल्यावर राज ठाकरे क्लिप पाठवायचं सांगतात. तशा त्या चंद्रकांत पाटलांना मिळतातही. त्यानंतरही चंद्रकांत पाटलांचा म्हणजे भाजपाचा आक्षेप काही दूर झाल्याचं दिसत नाही. भेटीनंतर चंद्रकांत पाटील बोलतात, ट्वीटही करतात भूमिका मांडतात, “भेटीत राजकीय चर्चा झाली असली तरी ती युती संदर्भात नाही. जी झाली ती एकमेकांच्या भूमिकांविषयी होती”!

 

यशदायी ठरलेल्या आक्रमक मराठीच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण कशाला?

पुन्हा विषय तोच येतो, मनसेने कडवट मराठीवादाच्या आक्रमक भूमिकेच्या आधारे मुंबई, पुणे मनपात चांगलं संख्याबळ आणि नाशकात सत्ता मिळवली. शिवसेनेचे मोठे नुकसान झाले. तोच मुद्दा आता तसा नसल्याचं स्पष्ट करण्यासाठी खरंच मनसे प्रयत्न करतेय का? मनसेनं नव्यानं स्वीकारलेला मुद्दा, भले मग बाळा नांदगावकर म्हणतात तसा तो ठाकरेंच्या रक्तातच असलेला हिंदुत्वाचा आहे. पण तोही महत्वाचा, व्यापक भासणारा असला तरी मनसेला यशदायी ठरवत शिवसेनेला तीन-चार वर्षे पर्याय ठरवणारा ठरला तो मुद्दा मराठीचाच होता. त्यामुळे, दादा म्हणतात तसे, “मनसेने परप्रांतियांची भूमिका बदलल्याशिवाय चर्चा होणार नाही, असं मी गेल्या वर्षभरापासून सांगितलं आहे. त्यावर त्यांनी मला त्यांच्या भाषणाची क्लिप पाठवली. मी ते ऐकलं. त्यावरून आमच्यात चर्चा झाली”. तेव्हा स्वाभाविकच प्रश्न पडतो की खरंच मनसे केवळ अशा युतीसाठी त्यांचा मुळचा त्यांना स्थापनेनंतर प्रथमच यश मिळवून देणारा ठरलेला मराठीचा मुद्दा सोडून देणार? किंवा युतीसाठी मांडलेल्या भूमिकांवर पुराव्यासह स्पष्टीकरण देत राहणार? इथं थोडं नाही चांगलंच खटकतं!

 

फक्त चर्चेनं संभ्रम!

कारण चंद्रकांत पाटील, “मी त्यांना प्रदेश कार्यालयात भेटीला न बोलवता त्यांच्या घरी आलो” असं मोठं मन दाखवतानाच “ती एकमेकांच्या भूमिकेविषयी होती. ही सदिच्छा भेट होती. राजकीय चर्चा झाली. पण या भेटीत युतीचा प्रस्ताव नाही”, असंही स्पष्ट करतात. त्यातूनच एक वेगळा संभ्रम तयार होताना दिसतो.

 

चाललंय तरी काय?

त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की चाललंय काय? भाजपा हा आपल्या देशातील सर्वात व्यावसायिक शैलीत चालणारा पक्ष आहे. हे मी नकारात्मक अर्थानं लिहित नाही. भाजपाने भारतीय राजकारणाचे युद्धशास्त्र बदलले आहे. रणनीती बदलली आहे. रणनीतीची शस्त्र बदलली आहेत. आता राजकीय युती, आघाडीचे निर्णय हे वैचारिक बंधांच्या आधारावर नाही तर सांख्यिकी विश्लेषणाच्या (data analysis) आधारे होतात. भाजपाचे नेते एवढ्यांदा मनसेभोवती पिंगा घालतात, याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना मनसे हा विषय भाजपाच्या फायद्याचा वाटतोय. पण तो नेमका कसा आणखी फायद्याचा करता येईल, जो काही तोटा होऊ शकतो तो कसा टाळता येईल, किंवा किमान करता येईल यावर पुन्हा विश्लेषण होईल. ते मांडत त्याआधारे चिंतन-मंथन होईल. मग ठरेल. तोपर्यंत मनसेच्या बाळा नांदगावकरांसारख्या कडवट निष्ठावान नेत्यांना पक्षाचा कुठेतरी फायदा होईल, असा आनंद मानायला हरकत नसावी.

भाजपाला मनसे पाहिजे!

पण तरी भाजपाचे काय चालले आहे, यावर विचार आवश्यक आहे. भाजपाचे नेते मनसे नेत्यांना भेटतात, थेट मनसेविरोधात बोलत नाहीत, याचा अर्थ स्पष्ट आहे की मनसे त्यांना पाहिजे आहे! पण त्याचवेळी ते युतीची चर्चा नाही म्हणतात, तेव्हा मनसे त्यांना नको, असेही दाखवतात. भाजपाला मनसे पाहिजे, भाजपाला मनसे नको, याचा नेमका अर्थ काय?

शिवसेनाविरोधी पक्षांची मनसेही ही गरज!

भाजपाला मनसे पाहिजे आहेच. शिवसेनाविरोधी कोणत्याही पक्षासाठी मनसे ही गरज आहे. कोणत्याही पक्षासाठी. आठवून पाहा. मनसे २००७मध्ये स्थापन झाली. २००८नंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. २००९च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला सत्ता यश मिळवण्यात मनसेला मिळालेल्या यशाचा मोठा वाटा होता. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असेपर्यंत मनसेचाही प्रभाव चांगलाच होता. पुढे पृथ्वीराज चव्हाण आले. मतांच्या राजकारणाबाहेरचा माणूस. त्यांचं उद्धव ठाकरेंशी चांगलं जुळलं. योगायोगही असावा पण मनसेच्या यशाला तेथूनच उतरती कळा लागली. मनसे फॅक्टर हा शिवसेनेची मते फोडण्यासाठीचा एक महत्वाचा असतो. आताही भाजपाला त्यासाठीच मनसे महत्वाची वाटत असणार. भाजपाला मनसे पाहिजे असणार ती त्यासाठीच. शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावरील कामगिरीमुळे वाढलेल्या लोकप्रियतेचा फायदा मिळणार असेल तर आगामी मनपा निवडणुकांमध्ये त्याला छेद देणारं काहीही असेल तर ते भाजपाला पाहिजे असणारच! त्यात पुन्हा असा पक्ष जर सोबत असेल तर फक्त स्थानिक राजकारणाचा विचार केला तरीही भाजपासाठी शिवसेनेसाठी वजाबाकी आणि स्वत:साठी बेरजेचा मोठा फॉर्म्युलाच हाती लागेल. त्यासाठी ते राज ठाकरेंच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ या भाजपा आणि मोदीविरोधातील उघडा पाडणाऱ्या प्रचारालाही नजरेआड करतील. राजकारणात तेवढे विस्मरण करावेच लागते. किमान झाल्यासारखं दाखवावंच लागतं.

भाजपाला मनसे नको!

पण भाजपाच्या स्थानिक मनपा निवडणुकांच्या मार्गात एक अडथळा आहे तो उत्तरप्रदेशसारख्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा. तेथेच कोठेतरी मग भाजपाला मनसे नकोची भूमिका सुरु होते. त्यातूनच मग चंद्रकांत पाटलांसारखा कडवट संघनिष्ठ असूनही भूतकाळात संघविरोधी कडवट भूमिकेतील राणे कुटुंबांना जवळ घेण्यात गैर न मानणारा नेता मनसेकडून मात्र परप्रांतीयविरोधी भूमिकेवर आक्षेपांवर आक्षेप नोंदवत राहतो. मनसेच्या इंजिनाला भाजपाच्या बळाचा कोळसा मिळाला तर शिवसेनेविरोधातील वाफ तयार होईल. इंजिन जोरात पळू शकेल, पण भाजपालाही फायदा मिळवून देईल, अशी भाजपाचं मनसे मैत्रीमागचं समीकरण असावं. पण सोबत घेतलेलं इंजिन उत्तरप्रदेशात अडचणीत आलेल्या योगी आदित्यनाथांच्या यशोमार्गात मोठाच अडथळा आणू शकेल. भाजपाविरोधकांना उत्तरभारतीयविरोधी मनसेची दोस्त भाजपा असा प्रचाराचा मुद्दा आयता मिळू शकेल.

मनसेचे का वावडे?

अनेकांना प्रश्न पडेल. शिवसेनाही मराठीचा मुद्दा घेऊन आक्रमक असायची. मग शिवसेनेचे वावडे नव्हते, मनसेचे कसे असणार? फरक लक्षात घेतला पाहिजे. एकतर शिवसेनेशी युती केली तेव्हा भाजपा ही गरजवंत होती. तसेच शिवसेना ही १९९२पासून उत्तरप्रदेशात बाबरी पाडण्याची जबाबदारी घेणारा कडवट हिंदुत्ववादी पक्ष म्हणून आणि बाळासाहेब ठाकरे हिंदूह्रदयसम्राट म्हणून घराघरात आणि मनामनात पोहचले होते. त्यामुळे तोपर्यंत काहीशा सौम्य झालेल्य मराठीवादाचा मुद्दा तेवढासा नुकसानाचा नव्हता. मनसेचे तसे नाही. फोडलेली ती टॅक्सी वारंवार दाखवून मनसेला माध्यमांनी मोठं जसं केलं तसंच उत्तर भारतीयांच्या मनात मोठा दुष्मनही बनवलं. मग राज ठाकरेंची भूमिका तशी हिंदीद्वेषी नसली, वागिश सारस्वत, रिटा गुप्ता अशा अनेक उत्तर भारतीयांचा मनसेत सहज वावर असला, त्यांना ती आपली वाटली, तरी उत्तर प्रदेशात ती भाजपासाठी बाधक ठरू शकेल, ही भीती आहे. आणि भित्यापोटी ब्रह्मराक्षस तसं भाजपाला मिशन उत्तर प्रदेशात मनसेमुळे होणारं कोणतंही नुकसान परवडणारं नाही.

मनसे वेगळी लढली तरीही फायदाच!

यामुळेच शिवसेनेचं नुकसान करत भाजपाचा फायदा करण्यासाठी पाहिजे असणारी मनसे भाजपाला इतर कोणत्याही समीकरणात तोटा होत असेल तर नकोच असेल. किमान अधिकृत नाते नकोच नको असेल. तसंही जसा काँग्रेसचा मनसे स्वतंत्र लढण्यामुळे किमान एक निवडणूक फायदा मिळवता आला तसाच भाजपालाही मनसेला स्वतंत्र राखत शिवसेनेचं नुकसान करतानाच भाजपाचा फायदा करता येईल. तो अप्रत्यक्ष असेल एवढंच. त्यात पुन्हा वारंवार त्यांच्या उत्तर भारतीय मुद्द्यावरील भूमिकेला विरोध दाखवत, त्यामुळे मनसेशी युती नाही, असं दाखवत मनसेचं मराठी मनात आणि भाजपाचं उत्तर भारतीयांच्या मनातील स्थान मोठं करता येऊ शकते.

मनसे वेगळी लढली तर भाजपाविरोधातील मतेही विभागली जातील. त्याचा सर्वात मोठा फायदा २००९च्या अशोक चव्हाण काळातील काँग्रेस सारखाच भाजपाला होईल. मनसे भाजपा आणि आघाडी अशा दोन टोकांना असलेला एक तिसरा पर्याय म्हणून मतदारांपुढे असेल. त्यातून मनसेचाही फायदा होऊ शकतो. युती नसल्यानं थेट जास्त जागा मिळवणं शक्य नसलं तरी पाडण्यासाठीचं बळ दाखवल्यानं एक वेगळं अस्तित्व दिसून येईल.

राजकारण आहे…

अर्थात बाळा नांदगावकर म्हणाले तसं, राजकारण आहे. कधीही काहीही होऊ शकतं. गरजच असेल तर भाजपा कमळाबाई म्हणून हिणवलं जात असतानाही शिवसेनेशी युती कायम राखण्याइतकी राजकीय परिपक्वता दाखवत होती. इथं तर बाळासाहेब नाही तर राज ठाकरे आहेत! ते काही तेवढं हिणवणारं नाहीत, एवढं नक्की!!

 

tulsidas bhoite

(तुळशीदास भोईटे मुक्तपीठचे संपादक आहेत. संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite)

 

पेगॅसस हेरगिरी: अमित शाह यांच्या ‘क्रोनोलॉजी’ आरोपामागील रणनीती समजून घ्या!


Tags: @SandeepDadarMNS mnsBJPdevendra fadanvismnsmumbaiRaj Thackerayचंद्रकांत पाटीलनाशिकशिवसेना
Previous Post

स्टोरीटेलवर आता फ्रीडम ऑफर!

Next Post

“गुणवत्तापूर्ण शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान द्यावे”

Next Post
CM Uddhav Thackeray

"गुणवत्तापूर्ण शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान द्यावे"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!