मुक्तपीठ टीम
कोरोना महामारीच्या संकटकाळात सामान्य माणूस पुरता हतबल झाला असून, हॉस्पिटलमध्ये प्रवेश, व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता, प्लाज्माची आवश्यकता, रुग्णाला जेवणाची व्यवस्था अशा अनेक अडचणींमध्ये रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ‘वीर सेवक’ प्रकल्प सुरू केला असून या प्रकल्पाद्वारे विविध आरोग्यविषयक समस्यांच्या समाधानासाठी वैद्यकीय समुपदेशन सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
आजाराचा संसर्ग झाल्यास काय करावे, कुठे संपर्क साधावा, नातेवाईकांना कशा प्रकारे वैद्यकीय उपचार द्यावेत, अशा विविध प्रश्नांच्या समाधानासाठी भाजपा अल्पसंख्यक मोर्चा प्रदेशाध्यक्ष एजाज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा अल्पसंख्याक मोर्चा (जैन)चे प्रमुख संदीप भंडारी यांच्या संकल्पनेतून भाजपा अल्पसंख्याक मोर्चा (जैन) च्या वतीने एका वॉर रूमची निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये एका विशेष टास्क फोर्सच्या माध्यमातून विविध वैद्यकीय समस्यांच्या समाधान व मदतीसाठी हा वीर सेवक प्रकल्प सज्ज असेल. एका हेल्पलाईन नंबरद्वारे राज्यातील विविध क्षेत्रांतील विशेष जाणकार डॉक्टरांकडून गरजूंना समुपदेशन करण्यात येईल.
लॉकडाउनमध्ये छोट्यामोठ्या आजारासाठी डॉक्टरकड़े जाण्यास लोक धास्तावतात. डॉक्टरकडे जाण्यासाठी घराबाहेर पडलेच, तर संसर्गाचीही भीती असते. यावर उपाय म्हणून सामान्य नागरिकांसाठी घरबसल्या स्पेशालिस्ट डॉक्टरचे ऑनलाइन मार्गदर्शन विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपा अल्पसंख्याक मोर्चा (जैन) चे प्रदेश प्रमुख संदीप भंडारी यांनी दिली. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता या संकटकाळात जनतेच्या मदतीसाठी खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
या समाजोपयोगी महायज्ञाचे उद्घाटन “भगवान महावीर जन्म कल्याणक” (वीर तेरस) च्या शुभदिनी, २५ एप्रिल रोजी व्हर्चुअल मिटींगच्या माध्यमातून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश अध्यक्ष एजाज देशमुख, अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या उपस्थितीत होणार आहे.