मुक्तपीठ टीम
केंद्राच्या अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर देशात ठिकठिकाणी तरुण रस्त्यावर उतरले आहेत. बिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा या राज्यांत आंदोलन करण्यात आले. अग्निपथ योजनेवरून देशभरातील वातावरण तापलेलं असताना, आता भाजपा नेत्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. यावरून आता अग्निपथ योजनेचा मुद्दा अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कैलास विजयवर्गियांमागोमाग केंद्रीय मंत्री व्हीके सिंह यांनी सैन्य हे रोजगाराचं साधन नाही, असं म्हणत आंदोलक तरुणांना डिवचण्याचंच काम केल्याची चर्चा आहे.
अग्निवीरांना भाजपा ऑफिसमध्ये सुरक्षारक्षक म्हणून प्राधान्य देईन- कैलास विजयवर्गीय
- भाजपाचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय इंदौरमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले की, लष्कराच्या प्रशिक्षणात डिसिप्लिन आणि दुसरं आज्ञेचं पालन करणं असतं.
- जेव्हा अग्निवीर ट्रेनिंगसाठी जातील घेतील आणि चार वर्षांच्या सेवेनंतर तिथून बाहेर पडतील.
- साडेसतरा वर्षांपासून २३ वर्षांपर्यंत… जर अग्निवीर २१ वर्षांचा असताना भरती होत असेल, तर चार वर्षात २५ वर्षांचा होईल.
- २५ वर्षांच्या वयात बाहेर पडल्यानंतर त्याच्या हातात ११ लाख रूपये असतील.
- शिवाय अग्निवीर म्हणून बाहेर फिरेल.
- मला जर भाजपा ऑफिसमध्ये सुरक्षारक्षक ठेवायचा असेल, तर अग्निवीरांना प्राधान्य देईन.
- कैलाश विजयवर्गीय यांनी अग्निवीरांबाबत केलेले वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
- ज्यावर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी निशाणा साधला आहे.
लष्कर हे रोजगाराचे साधन नाही…जर तुम्हाला आवडत नसेल तर येऊ नका! व्हीके सिंग
- भाजपा नेते, केंद्रीय मंत्री व्हीके सिंग यांनी अग्निपथ योजनेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
- योजना जाहीर झाल्यानंतर नुकत्याच झालेल्या हिंसाचाराबद्दल त्यांनी आंदोलकांनाही खडसावले.
- व्ही के सिंह नागपुरात म्हणाले की, माझा विश्वास आहे की जर कोणी सैन्यात ४ वर्षे सेवा केल्यानंतर आला तर तो सक्षम आहे आणि त्याला कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही.
- लष्कर हे रोजगाराचे साधन नाही.
- हे दुकान किंवा कंपनी नाही.
- जो कोणी सैन्यात भरती होतो तो स्वेच्छेने तिथे जातो.
- सशस्त्र दलांनी कोणावरही सक्ती केली नाही.
- पुढे ते म्हणाले, ज्याला यायचे आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर येऊ नका.
- कोण म्हणतंय तुम्हाला यायला, तुम्ही बस जाळत आहात, ट्रेन जाळतायत… तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही तुम्हाला सैन्यात घेऊ.