मुक्तपीठ टीम
मागील दोन दिवसांपासून बिहारच्या राजकारणात मोठे भूकंप होत आहेत. नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भाजपला मोठा शह दिल्याने आज बिहार विधानसभेच्या एतिहासात पहिल्यांदाच भाजपा हा एकटा विरोधी पक्ष राहिला आहे. बुधवारी स्थापन होणाऱ्या नव्या सरकारमध्ये राज्यातील पाच पक्ष एकत्र असतील. विरोधी पक्षात ७७ आमदारांसह भाजपा हा एकमेव पक्ष राहिला आहे. माजी उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांना विरोधी पक्षनेते केले जाऊ शकते.फारतर एक वेगळा पक्षही विरोधात आहे. एक आमदार असलेला. तो म्हणजे एमआयएम.
२४२ सदस्यांच्या बिहार विधानसभेत भाजपा वगळता सर्व निवडून आलेले सदस्य सत्ताधारी पक्षाचे सदस्य असतील. विरोधी पक्षात एकच पक्ष असताना अशी परिस्थिती गेल्या तीन दशकात कधीच नव्हती. १९९० मध्ये लालू प्रसाद बिहारचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळीही काँग्रेसशिवाय इतर पक्ष विरोधी पक्षात होते. डॉ. जगन्नाथ मिश्रा विरोधी पक्षनेतेपदी होते.
भाजपा आणि समता पक्षाचे सदस्य १९९५ मध्ये विरोधी पक्षाचे सदस्य होते. यशवंत सिन्हा हे काही दिवस विरोधी पक्षनेते होते. २००० मध्ये भाजपा आणि डाव्यांचे सदस्य विरोधी पक्षात होते. सुशील कुमार मोदी यांना पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते बनवण्यात आले. २००५ मध्ये आरजेडी, डावे आणि काँग्रेस विरोधात बसले. माजी मुख्यमंत्री राबडी देवी विरोधी पक्षनेत्या बनल्या.
असं आहे बिहार विधानसभेतील संख्याबळ…
सत्ताधारी
एकूण संख्याबळ: २४३
प्रभावी संख्या: २४२ (१ राजद सदस्य अपात्र)
बहुमत: १२२
- जेडयू – ४६ (पक्षाचे ४५ आमदार, १ अपक्ष)
- राजद : ७९
- काँग्रेस : १९
- सीपीआय(एमएल): १२
- सीपीआय: २
- सीपीआय(एम): ०२
- एचएएम: ०४
विरोधक
- भाजपा – ७७
- एमआयएम – १