मुक्तपीठ टीम
मुंबईतील प्रभादेवी इथे शिंदे गट आणि शिवसेनेत झालेला राड्यात आमदार सदा सरवणकर यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबारप्रकरणी गुन्हा दाखल झाला. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष अटळ मानला जात होता. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांमध्ये शिंदे गटाचा अतिरेक दिसत असल्याने भाजपातही अस्वस्थता व्यक्त होत आहे. तर त्याचवेळी भाजपाचे आमदार नितेश राणे यांची अचानक सुरु झालेली लव्ह जिहाद आक्रमकता, अमरावतीतील खासदार आमदार राणा दांपत्याच्या आक्रस्ताळेपणा, पोलिसांना धमकावण्याकडे शिंदे गट बोट दाखवत आहे.
जाहीररीत्या बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांना संयम बाळगायला सांगायचा सल्ला दिला असला तरी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली बैठक ही भाजपाला सत्तेवर असताना होणाऱ्या घटनांमुळे जनमत विरोधात जाण्याचा धोका निर्माण करणारी वाटत असल्याचे संकेत देणारी मानली जात आहे.
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत, संघर्षांच्या घटनांमध्ये वाढ
- अमरावतीत लव्ह जिहाद आरोप करत खासदार आमदार राणा दांपत्याने पोलिसांवरच आक्रस्ताळा हल्लाबोल केला. त्यांना भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णींचीही साथ होती. अखेर मुलीने पुढे येत बदनामीचा आरोप केल्याने, अडचण झाली.
- शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी एका कॅटरिंग मॅनेजरला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला.
- शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी शिवसैनिकांना हात-पाय तोडण्याची धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
- जळगावमधील शिवसेनेशी निष्ठावान राहिलेल्या महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर गणेशोत्सव मिरवणुकीच्यावेळी सुतळीबॉम्ब फेकत हल्ला करण्यात आला. ननंदेला मारहाणही झाली. यामागे थेट शिंदेगट नसला तरी त्यांचे समर्थकच असल्याची कुजबुज झाली.
- मुंबईत माझगाव, कल्याण येथेही शिवसैनिकांवर शिंदे समर्थकांकडून हल्ल्याच्या घटना घडल्या.
- ताजी घटना मुंबईतील प्रभादेवीत घडली. जेथे शिवसैनिक आणि शिंदे समर्थकांमधील राडा झाला. त्यानंतर थेट आमदार सदा सरवणकरांवर पोलीस ठाण्याच्या आवारात गोळीबारप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.
सतत घडणाऱ्या या घटनांमुळे शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे शिवसेना फोडून हे सरकार सत्तेवर आणणाऱ्या भाजपाच्या प्रतिमेला धक्का बसण्याची भीती आहे. त्यामुळे भाजपाचे काही नेते खासगीत शिंदे गटाच्या अधिकारी, राजकीय कार्यकर्ते यांच्याविषयी बिहार स्टायलीत वागण्याबद्दल नाराजी व्यक्त करतात. तर शिंदे गटही राणा दांपत्य भाजपाच्या तिकिटासाठी आक्रस्ताळे वागून विरोधकांचा फायदा करत असल्याचा आरोप करतात. तसेच नितेश राणे आपलंच राज्य असताना पोलिसांविरोधात मोर्चे काढतात, हेही योग्य नसल्याचं मत शिंदे गटाकडून व्यक्त केलं जातं.
याविषयी अधिकृत बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांना संयम बाळगायला सांगायचा सल्ला दिला असला तरी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीत यावरही चर्चा झाल्याचे कळते.
याविषयांवर झाली चर्चा!!
- गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रभादेवी इथे शिंदे आणि ठाकरे गटात राडा पाहायला मिळाला.
- त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा बंगल्यावर चर्चा झाली.
- शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांच्यावर आर्म अॅक्टनुसार कारवाई करण्यात आल्याची देखील चर्चा झाल्याची माहिती आहे.
- देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असून त्यांनी प्रभादेवी प्रकरणाबरोबरच पोलिसांच्या बदल्यांच्या विषयी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली.
- पोलिसांच्या बदल्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल अशी शक्यता या बैठकीनंतर व्यक्त केली जात आहे.
- राज्याचे गृहमंत्री म्हणून राज्यातील कायदा-सुव्येवस्थेसाठी देवेंद्र फडणवीसांचीच जबाबदारी असणार आहे, त्यामुळे ती जर बिघडली तर त्यांच्या आणि भाजपाच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो.