मुक्तपीठ टीम
पेगासस हेरगिरी प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने २९ पैकी ५ मोबाइलमध्ये मालवेअर आढळले असून पेगासस हेरगिरीचे ठोस पुरावे आढळले नसल्याचे म्हटले. सरन्यायाधीश एनव्ही रमण, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावर आता भाजपाने या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला असून त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
भाजपाचा राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा!!
- भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेतून काँग्रेसवर एकापाठोपाठ एक हल्ला चढवला.
- या प्रकरणावर काँग्रेसने देशद्रोहाचा आरोप केला होता आणि पावसाळी अधिवेशन होऊ दिले नाही.
- राहुल गांधी म्हणाले होते की पेगासस हा भारताची लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न आहे.
- हा देशाच्या संस्थांवर आणि देशावर हल्ला आहे.
- त्यांनी असे वादळ निर्माण केले, मग आज काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी माफी मागतील का?
- हे एका ठरवून केलेल्या मोहिमेनुसार घडलं आहे. या मोहिमेचा उद्देश पंतप्रधान मोदींना कमजोर करण्यासाठी बेताव वक्तव्यांचा होता.
- खरे तर राहुल गांधी, काँग्रेसने आपल्या संलग्न संस्थांमध्ये पंतप्रधान मोदींबद्दल विष भरले आहे आणि ते त्यांचा अपमान करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात पण खोटेपणा फार काळ टिकत नसतो.
न्यायालयात आज काय घडले?
- सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली.
- खंडपीठासमोर तीन भागातील अहवाल आले आहेत.
- त्यातील दोन अहवाल हे तांत्रिक समितीचा असून एक भाग हा सर्वोच्च न्यायालयाल निवृत्त न्यायाधीश आर. व्ही. रविंद्रन यांच्या समितीचा आहे.
- या अहवालातील एक भाग सार्वजनिक करण्यात येणार असल्याचे खंडपीठाने म्हटले.
- न्या. रविंद्रन यांच्या समितीने केलेल्या शिफारसी या सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित होणार असल्याचे सरन्यायाधीश रमण्णा यांनी सांगितले.