मुक्तपीठ टीम
मुंबईसह महाराष्ट्रात अराजक माजल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा नेते आशिष शेलार, मंगलप्रसाद लोढा यांनी या पत्रकार परिषदेत आक्रमकतेनं ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. मात्र, भाजपाची राष्ट्रपती राजवटीची मागणी नसल्याचे आमदार आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. सकाळपासून चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांनी केलेल्या राष्ट्रपती राजवटीच्या मागणीमुळे शिवसेनेसह आघाडीतील पक्षांना राजकीय फायदा होण्याची शक्यता असल्याने भाजपाने त्याबाबतीत आस्ते कदम केल्याची शक्यता आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या मातोश्रीत हनुमान पठनाच्या इशाऱ्यानंतर मुंबईत शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसैनिक मातोश्रीबाहेर पहारा देत आक्रमकता दाखवत असतानाच राणांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेरही मोठ्या संख्येनं शिवसैनिक जमले आहेत. त्याचवेळी शुक्रवारी रात्री भाजपाचे नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. याआधीही भाजपाच्या पोलखोल यात्रांनाही शिवसेनेचा विरोध केला. त्याचा उल्लेख करत भाजपा नेत्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.
भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल!
- नवनीत राणा, रवी राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांचा जमाव
- भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला
- आर्यन खान प्रकरणातील साक्षीदाराचा मृत्यू
- आर्यन खान प्रकरणातील अधिकाऱ्यावर मंत्र्यांचीच टीका
- किरीट सोमय्या यांच्याबाबतीत सरकारी छळवाद
- भाजपाच्या पोलखोल यात्रेच्या गाडीवर हल्ला
- भाजपाच्या पोलखोल सभांना शिवसैनिकांचा विरोध
प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. आमदार आशिष शेलार यांनी आक्रमकतेने शिवसेनेवर टीका करतानाच भाजपाची पुढची भूमिका सांगितली. त्यानुसार भाजपा पोलीस आयुक्तांना भेटून तक्रारी करणार आहेत. मात्र, राज्यात अराजक माजले असले तरी भाजपाने राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सकाळपासून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेली राष्ट्रपती राजवटीच्या मागणीपासून भाजपाने वेगळी भूमिका असल्याचे स्पष्ट झाले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रपती राजवटी लावण्याच्या धमकीनं शिवसेनेला फरक पडत नाही, अशी भूमिका मांडली. त्यामुळे भाजपाचा त्या मागणीमुळे फायदा होण्यापेक्षा शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीला राजकीय फायदा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळेच भाजपाने राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवर पक्ष म्हणून थेट न बोलता टप्प्या-टप्प्यानं काहीसं आस्तकदम जाण्याची भूमिका घेतली असण्याची शक्यता आहे.