मुक्तपीठ टीम
एकीकडे शिंदे गट भाजपासोबत युती करून महाराष्ट्रात सरकार चालवत आहे, तर दुसरीकडे मात्र त्यांच्या गटातल्या मंत्र्यांच्या विधानांमुळे शिंदे-फडणवीस सरकारवर अडचणीत येत आहे. शिंदे गटातील आमदारांची नाराजी आता लपून राहिलेली नाही. शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिंदे गट आणि भाजपा युतीबाबत तसेच निवडणूक चिन्हावर खळबळजनक वक्तव्य केलं आहे. अब्दुल सत्तार यांनी “माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको,” असं मोठं विधान केलं आहे. तसेच “मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईन,” असेही अब्दुल सत्तार म्हणाले. अब्दुल सत्तारांच्या या विधानांनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको…
- अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
- माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको.
- या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत व्हावी.
- माझ्याच नाही, तर ज्या ज्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघाप्रमाणे परिस्थिती असेल त्या त्या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती करण्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी विचार करावा.
- शेवटी निवडून आल्यावर सत्ता स्थापन करताना आपण सोबत राहू.
- दिल्लीत आणि मुंबईतसह जिल्ह्यात, महापालिकेत, जिल्हा परिषदेत सोबत राहू.
- स्थानिक पातळीवर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपा असे दोघेच आहोत.
- त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे.
- जो निवडून येईल तो सत्ताधाऱ्यांचा म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच कार्यकर्ता असेल.
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईन!!
- मी एकनाथ शिंदेंना सांगितलं की मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईन.
- कमकुवत माणसाला काहीतरी आधार लागतो.
- मी कार्यकर्ता आहे आणि जो कार्यकर्ता असतो त्याला कधीही कोणत्याही गोष्टीची भीतीच वाटत नाही.
- कार्यकर्ता पद कुणी हिसकावूनही घेऊ शकत नाही.
- आमदार, खासदार, मंत्रीपद निघून जाईल, आणखी काही पदं असतील ती जातील, पण कार्यकर्ता हे पद कधीही जात नाही.