मुक्तपीठ टीम
सोमवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. शिंदे-फडणवीस सरकारनं बहुमताचा ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत बोलण्यासाठी अनेकांनी भाषणं केली. यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अत्यंत आक्रमक शैलीत भाजपावर निशाणा साधला. “शिवसेनेला आपसात लढवून संपवायचं, हा भाजपाचा डाव! एकनाथराव सावध व्हा!” शिवसेना वाचवण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन पावलं मागे घेण्याचा आवाहन केलं आहे.
आज या महाराष्ट्रामध्ये आमचे मित्र एकनाथ शिंदे आणि आमचे दुसरे मित्र देवेंद्र फडणवीस यांचं नव्याने सरकार स्थापन झालेलं आहे. आणि त्या सरकारचा अभिनंदन प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभा अधिनियम २३ या अन्वये आपण सभागृहामध्ये आणलेलं आहात. आणि त्यावर मी माझं मत माडण्याकरता मी उभा आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करताना सांगितलं की लोकशाहीतला दुसरा आवाजही ऐकला पाहिजे, म्हणून माझी खात्री आहे की विरोधी पक्ष म्हणून मी दुसरा आवाज आहे, माझेही काही शब्द, जे आवडो ना आवडो ते ऐकून घ्यावे.
काय म्हणाले भास्कर जाधव?
- सन्मानिय एकनाथजी शिंदे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
- ते माझे माझे जवळचे मित्र आहेत.
- गेल्या आठ दिवसात मी झोपलेलो नाही.
- मी विचलित आहे, मी अस्वस्थ आहे.
- एकनाथ शिंदे आजही सभागृहात सांगतात की मी शिवसेनेचा आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, आजही सांगतात की आनंद दिघेंचा वारसदार आहे.
- मी सुद्धा ते मान्य करतो. मला एकनाथ शिंदेंना सांगायचंय, तुमच्यावर मोठी जबाबदारी आलीय, तुम्ही शिवसेना प्रमुखांचं नाव घेता.
- मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगायचंय, तुमच्यावर मोठी जबाबदारी आलीय, तुम्ही शिवसेना प्रमुखांचं नाव घेता, की आपण शिवसनेा प्रमुख्यांचे शिवसैनिक आहात.
- खरं बघितलं तर आपली एवढी उठबस नाही, जास्त भेट नाही.
- या सभागृहामध्ये दोन-तीन टर्म आपण समोरासमोर येत होतो.
- मी राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये होतो.
- तुमची साधारण मान वाकडी करून चालण्याची स्टाईल आहे.
- तुम्ही समोरसमोर आलात की जय महाराष्ट्र म्हणाले की जय महाराष्ट्र बोलून पुढे जायचात.
- तुम्ही कधी माझ्याशी बोलत नव्हता.
- मी पुन्हा शिवसेनेमध्ये आलो, तुमची गटनेते पदी निवड झाली आणि तुमचा सत्कार मी पहिला केला.
- एकनाथ शिंदे यांच्या ऑफिसमध्ये मी दोन वेळा आलो पण एकदाच आपली भेट झाली.
- मी तुमच्या नंदनवन बंगल्यावर फक्त दोन वेळा आलो, दोन वेळा आपली भेट झाली.
- मी मंत्रालयाच्या दालनामध्ये तुमच्या आलो पण तुमची आणि माझी एकदा ही भेट झालेली नाही.
- तरी देखील तुमची लोकांना मदत करण्याची जी पद्धत बघितली ती भावली, कोकणातल्या महापुरात तुम्ही चांगली मदत केली हे मान्य करतो.
- लोकांसाठी धावून जाता ही वस्तूस्थिती आहे.
- आपलं काम मी जवळून पाहिलंय, या शिवसेनेत एका बाजूला ४० शिलेदार तुमच्यासोबत आहेत, तर दुसऱ्या बाजूला उरलेले शिवसैनिक शिवसेना वाचवायला उभे आहेत, कोण कुणावर घाव घालणार आहे, कोण कुणाला घायाळ करणार आहे आणि कोण कुणाला धारातिर्थी पाडणार आहे याचा विचार करा.
- माणसाने एकदा लढा पुकारला तर लढाई लढण्यापूर्वी थांबायचं कुठे हे ज्याला कळतं तोच खरा यशश्वी नेता.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारत आणि रामायणाची पुनरावृत्ती!
- तुमच्या मनातले अनेक दुःख असतील ते मांडा तुम्ही.
- पण महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारताची पुनरावृत्ती होणार आहे.
- या महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारत आणि रामायणाची पुनरावृत्ती होणार आहे.
- सख्खे चुलत भाऊ समोरासमोर उभे राहणार आहेत.
- आणि एकमेकांना मारणार आहेत.
- पानिपतच्या युद्धात एकमेकांच्या विरोधात दिल्लीच्या बादशहासाठी लढत आहेत.
- पण दिल्लीचा बादशहा मात्र सहिसलामत आहे.
- मरताय ते फक्त महाराष्ट्राती मराठी लोक.
- बादशहा मात्र सुखरुप आहे
- राज्यात करोनासारखं संकट आलं.
- महाराष्ट्राची एक परंपरा आहे.
- एक विचारधारा आहे.
- राज्य संकटात असताना सरकार कोणाचे आहे हे पाहिलं जात नाही; तर संकटात राज्य बाहेर कसे येईल यासाठी सत्ताधारी आणि विरोधक खांद्याला खांदे लावून लढत असतात.
- मात्र करोनासंकटात तुमची प्रत्येक कृती ही विरोधातील होती
मुख्यमंत्री शिंदेंना अभिनंदन करताना जबाबदारीची जाणीव करून दिली…
- सकाळी सकार पडेल, पंधरा दिवसात पडेल, आज पडेल उद्या पडेल असं म्हटलं गेलं.
- तुम्ही कधी कोणाच्या हातात भोंगा दिला, कधी कोणाच्या हातामध्ये हनुमान चालिसा दिलात.
- कधी महाराष्ट्रात नुपूर शर्मा आणलीत.
- कधी महाराष्ट्रात हिजाब आणला.
- कधी कंगना राणौत आणलीत तर कधी सुशांतसिंह राजपूत महाराष्ट्रात आणला.
- या महाराष्ट्राची सत्ता उलथवून लावण्याचा प्रयत्न केला.
- पण सत्ता कायम राहिली,
- भाजपाकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करण्यात आला.
- पण सत्ता उलटली गेली नाही.
- आणि म्हणून मी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो.
- मात्र अभिनंदन करता तुमच्या जबाबदारीची जाणीव करुन देतो.
- तुम्ही ज्या भाजपाच्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करता, संजय राठोड यांचं मंत्रिपद घालवण्यासाठी या भाजपाने काय काय केलं, आता संजय राठोडांचं काय करता, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव यांच्यावर चौकशी लावली, नियती कोणालाही सोडत नाही, आज त्यांच्याच घराखाली केंद्र सरकारचे पहारे देऊन त्यांना वाचवावं लागतंय. हा नियतीचा खेळ आहे.
किती जणांना धुवून घेणार?
- ‘वर्मावर घाव पडतोय म्हणून माझं बोलणं ऐकून घेतलं जात नाही.
- भाजपाने राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं?
- तुम्ही सगळ्यांच्या मागे ईडी लावत आहात.
- या सगळ्या मराठी माणसांवर ईडी लावत आहात.
- मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतर पक्षाचे किती लोक तुम्ही पवित्र करून घेतले आहेत.
- प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, पडळकर, सुजय विखे, प्रसाद लाड, राम कदम, रणजित सिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, विजय गावित, दत्ता मोघे, सत्यजित देशमुख, काशिनाथ पवार, माणिकराव गावित, सुर्यकांता पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, सुरेश धस, प्रशांत ठाकूर, निरंजन डावखरे, नमिता मुंदडे, वैभव पिचड, कालिदास कोळंबर… किती जणांना धुवून घेणार?
तर हा महाराष्ट्र शिंदेंना डोक्यावर घेऊन नाचेल!
- एकनाथरावजी शिंदे साहेब हे तुम्हाला लढवत आहेत.
- शिवसेना विरुद्ध शिवसेना असं लढवत आहेत.
- यामुळे रक्तपात होईल तो शिवसेनेचा होईल, याठिकाणी घायाळ होतील ते फक्त शिवसैनिक होतील.
- आणि संपेल ती फक्त शिवसेना संपेल.
- यांचा २५ वर्षाचा इतिहास बघितला, तर ‘शिवसेना संपवणं हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे.
- तुमच्याबद्दल त्यांना काहीही प्रेम आलेलं नाही.
- याची अनेक उदाहरणं मी सांगू शकतो.
- तुम्ही मुख्यमंत्री झालात, याचा मी आनंद व्यक्त करतो.
- पण शिवसेना कशी वाचवायची? यासाठी प्रसंगी दोन पावलं माघारी या, तुम्ही शिवसेना फुटू दिली नाही, तर हा महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल, ही एवढीच भावना व्यक्त करतो.