मुक्तपीठ टीम
दहा निरागसांचे बळी घेणाऱ्या भंडारा रुग्णालय आगीचा चौकशी अहवाल सादर झाला आहे. नागपूरचे विभागीय आयुक्त संजीवकुमार यांच्या अहवालात शॉटसर्किटमुळे आग लागल्याचा उल्लेख आहे. तसेच दोन नर्स आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाकडेही बोट दाखवण्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाच्या शिशु विभागाला लागलेल्या आगीत १० नवजात बालकांना नाहक आपला जीव गमवावा लागला होता. या आगीची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीने मंगळवार, १९ जानेवारीला महाराष्ट्र सरकारला अहवाल सुपूर्त केला आहे. या अहवालात नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी सांगितले आहे की, हा अपघात शॉर्ट सर्किटमुळे झाला आहे. तसेच भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे याचा उल्लेखही अहवालात करण्यात आला आहे.
तपास समितीने तयार केलेला अहवाल सुमारे ५० पानांचा आहे. हा अहवाल बुधवारी मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल. तसेच महाराष्ट्र अग्निशमन विभागाचे संचालक पी. रहांगदले यांनीही आपला तपास अहवाल सरकारला सादर केला आहे. ही आग लागल्यानंतर रुग्णालय अग्निशमन विभागाच्या एनओसी शिवाय सुरू असल्याचे समोर आले.
अहवालात नेमके काय?
तपास अहवालात असेही नमूद केले आहे की, हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला आहे. यामुळे १० निष्पाप बालकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच या दुर्घटनेत रुग्णालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भयंकर घडलं होतं भंडाऱ्यात!
भंडारा येथील शासकीय रुग्णालयात मध्यरात्री आग लागली होती. त्यावेळेस सर्व रुग्ण झोपी गेले होते. परंतु अचानक लागलेल्या आगीमुळे रुग्णालय प्रशासनाला सावरण्याची संधी मिळाली नाही. तरी उर्वरित रुग्णांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. तसेच शिशु विभागातील १७ नवजात बालकांपैकी ७ बालकांना वाचवण्यात यश आले, मात्र १० नवजात बालकांचा बळी गेला.
पाहा व्हिडीओ: