मुक्तपीठ टीम
खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिटने दोन दिवसांपूर्वी सहा जणांना अटक केली. या लोकांनी फेक कॉल अॅपद्वारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोबाईल नंबर वापरला आणि एका बिल्डरकडून २० लाख रुपये उकळले. १४ जानेवारीला सकाळी सर्व आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही बातमी जरी मुक्तपीठनं आधी दिली असली तरी आज तुम्हाला सावध करायचं आहे, ते अजित पवारांचा नंबर असल्याचं भासवून फसवणूक करण्यासाठी या भामट्यांनी वापरलेल्या फेक कॉल अॅपबद्दल. कारण जे उपमुख्यमंत्रीपदावरील माणसाबद्दल घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं आणि व्यावसायिक किंवा वैयक्तिक नुकसानही!
या सायबर क्राईम गुन्ह्यात बिल्डरला २० लाखांचा गंडा घालण्यात आला. आरोपींनी गुगल प्ले स्टोअरवरून ‘फेक कॉल अॅप’ डाउनलोड केला होता. या अॅपच्या माध्यमातून त्यांनी बिल्डरला फोन केला असता त्यांच्या मोबाइल स्क्रीनवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोबाइल क्रमांक आला. त्यांनी स्वत:ला उपमुख्यमंत्र्यांचे पीए चौगुले असल्याचे सांगून प्रकल्प थांबवण्याची धमकी देत २० लाख रुपयांची मागणी केली. बिल्डरही त्यांच्या जाळ्यात सापडला आणि त्याने ठरलेल्या ठिकाणी जाऊन आरोपींना २० लाख रुपये रोख दिले. जमिनीच्या वादात आरोपींनी बिल्डरला मागे हटण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे बिल्डरला त्याच्यावर संशय आला आणि प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले.
फेक कॉल अॅपविषयीची संदर्भात माहिती
- जेव्हा आपण एखाद्याला कॉल करतो तेव्हा त्याच्या मोबाईलमध्ये आपला मोबाइल नंबर दिसतो, परंतु जर तुम्ही फेक कॉल अॅपवरून कॉल केलात तर त्याला तुमच्या वतीने फक्त फेक किंवा इतर कोणाचा मोबाईल नंबर एंटर केलेला दिसेल.
- फेक कॉलमध्ये समोरच्या व्यक्तीला कोणी कॉल केला हे कळत नाही.
- जर तुमचा मोबाईल नंबर ०००००० असा केला तर तोच नंबर समोर दिसून येईल.
- काही बनावट आयडी कॉलमध्ये, आपल्याला स्वत:चा आवाज पुरुष किंवा महिलेच्या आवाजातही बदलता येते.
असे अॅप बनवणारे बहुतेक लोक प्रँक कॉल अॅपद्वारे गुगल प्ले स्टोअरवर लिस्टेड करतात, परंतु त्याचा सहजपणे गैरवापर केला जाऊ शकतो. - गेल्या काही महिन्यांत गुगलने अशा अनेक फेक कॉल अॅप्सवर प्ले स्टोअरवरून बंदी घातली आहे.