मुक्तपीठ टीम
शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. येत्या ३ नोव्हेंबरला ही निवडणूक होणार आहे. त्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार आहे. तिथं शिवसेनेची जागा असतानाही लढणाऱ्या भाजपाला शिंदे गट साथ देतो की स्वत:ही लढतो, ते अद्याप स्पष्ट नाही. मात्र, लढो न लढो, शिवसेनेकडे धनुष्यबाण राहू नये, यासाठी शिंदे गटानं कंबर कसलीय. जर त्यांच्या प्रयत्नांना निवडणूक आयोगाची साथ लाभली तर चिन्ह गोठवलं जाईल. तसं झालं तर मूळ शिवसेना कोणत्या चिन्हावर लढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गटानं धनुष्यबाणावर मौनच ठेवलं होतं. पण नंतर अचानक त्यांनी निवडणूक आयोगात धाव घेतली. त्यांचा गटच खरी शिवसेना असल्याचा दावा करत धनुष्यबाणावरही दावा सांगितला. शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयातून आयोगासमोरील सुनावणी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण आता त्या सुनावणीला हिरवा कंदिल मिळाला आहे.
निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितल्याप्रमाणे घाईघाईत नाही तर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून, साक्षीपुरावे तपासूनच पक्ष आणि चिन्हाविषयीचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेने शुक्रवारी पुरावे सादर केले आहेत आणि आता पुढील सुनावणी सुरु होणार आहे. त्यामुळे त्वरित निर्णय होणार नाही, हे स्पष्ट होते. पण त्याचवेळी अंधेरी मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे तेथे पोटनिवडणूक जाहीर झाली. तिथं शिवसेनेची जागा असतानाही भाजपाने झटपट मुरजी पटेल या रमेश लटकेंविरोधातील भाजपा बंडखोराची उमेदवारी जाहीर केली. शिवसेनेने दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋजुता रमेश लटके यांची उमेदवारी जाहीर केली. खरंतर जागा शिवसेनेची असल्यानं ती जागा शिंदे गटानं लढणं अपेक्षित होतं. पण भाजपा तिथं लढतेय. शिंदे गट लढणार की नाही, ते स्पष्ट न करताच, तिथं लढणाऱ्या शिवसेना उमेदवार ऋजुता लटकेंना धनुष्यबाण चिन्ह मिळू नये, यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे पुरेसे समर्थन नसतानाही हा गट बेकायदेशीरपणे अंधेरी पोटनिवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची शक्यता असल्याचा अर्ज शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केल्याचे आज माध्यमांमध्ये आले. पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. शिवसेनेच्या बहुसंख्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी, तसेच अध्यक्षपदी निवड केलेली असल्याने या अर्जावर तातडीने निर्णय घेण्याची विनंती शिंदे गटाने केली आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने धनुष्यबाण गोठवला तर शिवसेना कोणत्या चिन्हावर पोटनिवडणूक लढणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तातडीने निर्णय घेण्याची शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी!!
- अंधेरी पोटनिवडणूकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
- निवडणूक अर्ज दाखल करण्याची मुदत ही १४ ऑक्टोबरपर्यंत आहे.
- ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पुरेसे समर्थन नसतानाही धनुष्यबाण हे चिन्ह ३ नोव्हेंबरला होणाऱ्या अंधेरी पोटनिवडणुकीत वापरण्याची शक्यता आहे.
- त्यामुळे अंधेरी पोटनिवडणूक लक्षात घेता धनुष्यबाण या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने तातडीने सुनावणी घेऊन धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला द्यावे, अशी विनंती या गटाने निवडणूक आयोगाला केली आहे.
- या अर्जासोबत प्रतिज्ञापत्र तसेच अन्य कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत.
- तसेच अजूनही पुरावे तसेच कागदपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे शिंदे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात नमूद केले आहे.
निवडणूक आयोग चिन्ह गोठवण्याची शक्यता!!
- शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी केली आहे.
- मात्र, शिंदे आणि ठाकरे गटाने सादर केलेल्या पुराव्यांची तपासणी निवडणूक आयोगाकडून होणे बाकी आहे.
- अशा परिस्थितीत निवडणूक आयोग घाईघाईत कोणताही निर्णय घेणार नाही.
- अन्यथा ज्या पक्षाच्या विरोधात निकाल जाईल, त्यांच्याकडून या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते.
- त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकणे आवश्यक आहे.
- ठाकरे व शिंदे गटाकडून धनुष्यबाण या राखीव चिन्हाची मागणी केली गेल्यास ते गोठविण्याचा आदेश आयोगाकडून दिला जाऊ शकतो.
- अशी परिस्थिती ओढवल्यास शिवसेना ३ नोव्हेंबरला अंधेरीत होणारी पोटनिवडणूक कोणत्या चिन्हावर लढणार, असा प्रश्न साहजिक उपस्थित होतो.
धनुष्यबाण गोठवला तर शिवसेना कोणत्या चिन्हावर पोटनिवडणूक लढणार?
- निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यास उद्धव ठाकरे यांनी ढाल-तलवार किंवा गदा या चिन्हावर लढण्याची तयारी ठेवली आहे, अशी चर्चा आहे.
- काहींचे म्हणणे ते दक्षिणेतील एक पक्ष वापरत असलेल्या उगवत्या सूर्य या चिन्हाचीही मागणी करेल, असं आहे.
- गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वेळ पडल्यास वेगळ्या चिन्हावर लढायची तयारी ठेवा, असे सांगितले आहे.
- त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी एव्हाना धनुष्यबाण चिन्ह गोठल्यास पुढे काय करायचे, याची योजना आखल्याचे सांगितले जात आहे.
- तर शिंदे गटाला अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत लढायचे नसले तरी आगामी काळात धनुष्यबाण हे चिन्ह कोणालाच न मिळाल्यास पुढे काय करायचे हा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्यापुढे असेल.
- नुकत्याच बीकेसी मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ५१ फुटी तलवारीची पूजा करण्यात आली. त्यामुळे आगामी काळात धनुष्यबाण न मिळाल्यास तलवार हे शिंदे गटाचे चिन्ह असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अंधेरीत काय घडणार?
धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेकडून हिरावलं गेलं तरी त्याचा फटका ऋजुता रमेश लटके यांना बसेल की उलट त्यांच्या पतीच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभुतीबरोबरच त्यांना पक्षाचे चिन्ह गोठवल्यामुळे निर्माण झालेल्या सहानुभुतीचाही फायदा मिळेल, अशी चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल हे गुजराती आहेत. त्यामुळे गुजराती मते त्यांनाच मिळतील, असा दावा केला जातो. त्यांची झोपडपट्ट्यांमधील मतांवर चांगली पकड मानली जाते. त्यांचं धनबळ हे सर्वात मोठं बळ मानलं जातं, त्यात पुन्हा भाजपा गल्ली ते दिल्ली बळ उतरवण्याची शक्यता असल्याने ते चांगले लढतील, एवढं नक्की आहे.
पण त्याचा अर्थ त्यांच्यासाठी सारं सोपं आहे, असं नाही. कामाच्या बळावर मराठी माणसांप्रमाणेच मुसलमान आणि उत्तर भारतीयांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या रमेश लटके यांच्या पत्नीला शिवसेनेच्या नेहमीच्या मतदारांशिवाय अन्यही मते मिळतील. शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीची मतेही मिळणार असल्याने भाजपा सोबत नसल्याने कमी होणाऱ्या मतांपेक्षा जास्त मते मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते. पण गेल्या वेळीही भाजपाच्या बंडखोरीमुळे ती मते मिळाली, नव्हतीच, उलट आता दरवेळी न मिळणारी मते मिळणार असल्याकडेही लक्ष वेधले जात आहे.
भाजपाची महाशक्ती, शिंदे गट आणि मुरजी पटेलांचं अर्थबळ यावर ते जिंकतात की धनुष्यबाण हाती असताना किंवा नसतानाही पतीची कामे, आघाडीची साथ आणि शिवसेनेचे बळ यावर ऋजुता रमेश लटके या अंधेरीत भगवा फडकवतात, हे लवकरच स्पष्ट होईल.