मुक्तपीठ टीम
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात सुमारे १० लाख बँक कर्मचारी १५ आणि १६ मार्च रोजी संपावर जाणार आहेत. बँक संघटना आणि केंद्र सरकार यांच्यातील बोलणी अयशस्वी ठरल्यानंतर संपाचा इशारा देण्यात आला आहे.
एआयबीईएचे सरचिटणीस सी.एच. व्यंकटचलम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४, ९ आणि १० मार्च रोजी बँक संघटना आणि केंद्रीय अर्थ मंत्रालय यांच्यातील बैठक अयशस्वी झाली. युनियनच्या म्हणण्यानुसार, जर सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सहमती दर्शविली तर ते त्यांच्या संपावर पुनर्विचार करतील. पण, अर्थ मंत्रालयाच्या प्रतिनिधीकडून कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही, त्यामुळे बैठकीत कोणताही सकारात्मक मार्ग निघाला नाही.
इंडियन बँक असोसिएशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, “युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने १५ आणि १६ मार्च रोजी संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. या संपात ९ बँक संघटना सहभागी होऊ शकतात. खासगीकरणाच्या विरोधात बँकांच्या संघटनांचा हा संप असेल.