मुक्तपीठ टीम
शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चंपा सिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत थापांनी शिंदे गटात प्रवेश केला. चंपा थापा यांच्या सोबतच बाळासाहेब ठाकरेंचे आणखी एक निकटवर्तीय मोरेश्वर राजे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. बाळासाहेबांचा सेवक असणाऱ्या चंपा थापा किंवा मोरेश्वर राजे काही राजकीय नेते किंवा पदाधिकारी नसतानाही त्यांना गटात घेऊन त्या घटनेला प्रसिद्धी देण्यामागे एकनाथ शिंदे यांचा काय हेतू असावा, असा प्रश्न चर्चेत आला आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सावली समजले जाणारे चंपासिंह थापा व मातोश्रीवर प्रदीर्घ काळ सेवा बजावलेले मोरेश्वर राजे यांनी आज टेंभीनाका येथील जय अंबे धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या दुर्गेश्वरी मातेच्या आगमन मिरवणुकीत आम्हाला पाठींबा देण्याचा निर्णय जाहीर केला. pic.twitter.com/UT82ppZlMV
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 26, 2022
थापा बाळासाहेबांचे जवळचे सेवक!
- चंपासिंग थापा ३० वर्षांपूर्वी नेपाळहून भारतात आले. सुरुवातीच्या काळात मुंबईच्या गोरेगावमध्ये राहून पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी छोटी-मोठी कामं केली.
- भांडूपचे नगरसेवक के.टी.थापा यांच्या ओळखीने चंपासिंग थापा यांना मातोश्रीवर प्रवेश मिळाला. त्यानंतर पुढील काही काळातच थापा बाळासाहेबांचे लाडके झाले.
- थापा बाळासाहेब ठाकरेंचं जेवण, औषधांच्या वेळा यासारख्या रोजच्या गोष्टींवर लक्ष ठेवत.
- मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर थापांनी बाळासाहेबांची जीवापाड काळजी घेतली.
- मोरेश्वर राजे हेही बाळासाहेब ठाकरेंसाठी येणारे फोन उचलायचे आणि ज्याने त्यांना फोन केला, त्यांनी त्यांचा निरोप पोहोचवायचे.
चंपा थापा आणि मोरेश्वर राजे हे राजकीय भूमिकेत नसले तरी त्यांचं बाळासाहेबांच्या सहवासात असणं, त्यांचे एकनिष्ठ सेवक ही त्यांची प्रतिमा लक्षात घेतच शिंदेंकडून त्यांना आपल्या गटात घेतलं गेलं असावं. त्याचा थेट राजकीय फायदा नसला, तरी बाळासाहेबांची जवळची माणसंही शिंदे गटाची शिवसेनाच खरी म्हणतात, असं चित्र उभं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यातून थेट नसला तरी बाळासाहेबांचा वारसा आम्हीच चालवतो, असा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे.