मुक्तपीठ टीम
वाहन कंपन्या वेगाने प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने धावत्या जगात टिकून राहण्यासाठी गाड्यांमध्ये नवनवीन प्रयोग करत असल्याचं पाहायला मिळत आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्यांकडचा कल वाढलेला दिसून येत आहे. अशातच प्रसिद्ध दुचाकी कंपनी बजाज ऑटो कंपनी इलेक्ट्रिक स्कूटरच्या स्पर्धेत उतरली आहे. बजाज लवकरच भारतीय बाजारपेठेत नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. पुण्यात बजाज चेतक इलेक्ट्रिकसोबत चाचणीदरम्यान ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर दिसून आली.
बजाजच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्प्लिट स्टाईल सँडल, वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेले ग्रॅब हँडल असेल. नवीन टायर हगर आणि स्विंगआर्म सेक्शन उपलब्ध असेल. याशिवाय चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या तुलनेत रियर सस्पेंशन, रिअर फेंडर आणि टेल सेक्शनसारखे भाग पूर्णपणे वेगळे असतील.
अधिकृतरित्या स्कूटरबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. नवीन स्कूटर चेतक इलेक्ट्रिकपेक्षा अधिक प्रीमियम असू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. हे टीवीएस iQube आणि ओला S1 सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा लांब पल्ल्याची आणि अधिक शक्तिशाली मोटरच्या क्षमतेची असणार आहे. बजाज चेतक इलेक्ट्रिकमध्ये 3kWh IP67 लिथियम-आयन बॅटरी पॅक आणि 3.8kW मोटर वापरण्यात आली आहे. इको मोडमध्ये त्याची रेंज ९५ किमीची आहे .