मुक्तपीठ टीम
इंदूरमधील भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणातील आरोपी पलक पुराणिकला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पलक चार वर्षे तुरुंगात होती. पलकवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या आरोपावरून जानेवारी २०२२मध्ये सत्र न्यायालयाने तिच्यासह दोन आरोपींना सहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. आरोपींनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र तेथून त्यांना दिलासा मिळाला नाही. याप्रकरणी आरोपी पलकने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ते मान्य केले आहे.
भय्यू महाराज यांनी १२ जून २०१८ रोजी स्वत:च्या लायसन्स रिव्हॉल्व्हरने कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर सुमारे सहा महिन्यांनी पोलिसांनी महाराजांचे तीन सेवक आरोपींना अटक केली होती.
आरोपी सेविकेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत युक्तिवाद सादर केला…
- याचिकेत आरोपी सेविका पलकच्या वतीने तिला सहा वर्षांची शिक्षा झाल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
- ती चार वर्षांपासून तुरुंगात असून तिची याचिका अजूनही प्रलंबित आहे.
- अशा स्थितीत तिला जामिनाचा लाभ देण्यात यावा. ती मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने पलकला जामीन मंजूर केला.
भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणातील तीन आरोपींवरील आरोप
- पलकवर भय्यू महाराजांसोबत अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोप आहे.
- या कामात पलकसोबत महाराजांचे सेवक विनायक दुधाळे आणि शरद देशमुख हेही होते.
- महाराजांना पैशासाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप आरोपींवर होता. याला कंटाळून भय्यू महाराज यांनी त्यांच्या फ्लॅटमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
- याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पलक आणि महाराज यांच्यातील चॅटिंगचा मोबाईलही जप्त केला होता.
- षड्यंत्र रचताना त्यांनी महाराजांकडून भरपूर पैसाही गोळा केला होता. त्यांच्या छळाला कंटाळून महाराजांनी आत्महत्या केली होती.
- सत्र न्यायालयाच्या आदेशाला पलकने मध्यप्रदेश उच्च न्यायालयात आव्हान दिले.
- जामीनही मागितला होता, पण दिलासा मिळाला नाही.