मुक्तपीठ टीम
योग आणि आयुर्वेदासाठी सध्या जगभर ख्यातनाम असणाऱ्या बाबा रामदेवांचा शब्द क्वचितच कुणी टाळत असावं. विशेषत: ते आरोग्यासाठी काही सांगतात तेव्हा लोक ऐकतातच ऐकतात. मग ते नेते असो वा सेलिब्रिटी. बालपणी मात्र त्यांनी हट्ट धरूनही त्यांच्या शिक्षकाने बिडीचे व्यसन सोडले नव्हते. मात्र, बाबा रामदेवही काही कमी नाहीत. त्यांनी मोठे नामांकित झाल्यावरही पाठपुरावा सुरुच ठेवला आणि शिक्षकाची बिडी सोडवली. कशी ते वाचा:
रामदेव बाबा मूळचे हरियाणामधील महेंद्रगड जिल्ह्यातील सैद अलीपूर गावचे आहेत. त्यांच्या बालपणीचे नाव रामकिशन होते. त्यांचे शालेय शिक्षण त्याच्या गावातील शाळेतून झाले. ज्या शाळेत ते शिकत होते, तिथे त्यांचे एक शिक्षक खूप बीडी प्यायचे. रामकिशनला ही गोष्ट आवडत नसे. त्यांनी त्या शिक्षकाला बीडीच्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी इतर सहकारी मित्रांसोबत बरेच प्रयत्न केले. परंतु त्यांना त्यात यश मिळू शकले नाही.
बाबा रामदेवांवर ‘एक योगी-योद्धा’ हे पुस्तक लिहिणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक संदीप देव यांनी या शिक्षकाची बिडी बाबा रामदेवांनी कशी सोडवली ते आता उघड केले आहे. जेव्हा रामकिशन हे योगगुरू बाबा रामदेव झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या व्यासपीठावरुन व्यसनाधीनतेविरोधातही मोहीम सुरु केली. ते उपदेश करताना बर्याच वेळा त्या शिक्षकाची कथा लोकांना सांगू लागले.
लाजेस्तव शिक्षकाने सोडली बिडी
अखेर एक दिवस त्यांच्याकडे एक पत्र आले. हे पत्र त्याच शिक्षकांचे होते. त्यांनी लिहिले होते, “स्वामीजी, मी तुमचा शिक्षक आहे, ज्याच्या बिडीच्या सवयीमुळे तुम्ही त्रासलेले होता. त्यावेळी तुम्ही माझे बिडी पिण्याचे व्यसन सोडवू शकला नाहीत. परंतु तुम्ही माझे उदाहरण तुमच्या प्रवचनांमध्ये इतक्या वेळा दिले की, मी लाजेने बिडी ओढणे सोडले आहे. आता कधीही बिडीला हात लावणार नाही. कृपया आता माझे उदाहरण देणे थांबवा.”
वडिलांचे व्यसन सोडवले
स्वामी रामदेव यांचे वडील रामनिवास यादव हे हुक्का व बिडीही प्यायचे. बालपणी रामदेव यांनी आपल्या वडिलांचीही व्यसनातून मुक्तता केली होती. स्वामी रामदेव यांनी आपल्या वडिलांना स्पष्टपणे सांगितले की, जर त्यांनी बिडी हुक्का सोडला नाही तर ते खाणे पिणे थांबवतील आणि तसेच केले. त्यांच्या वडिलांना कायमचे व्यसन सोडणे भाग पडले.
बाबाची भांग विहीरीत !
रामदेवच्या सैद अलीपूर गावात एक बाबा राहत होता आणि तो भांगचा भरपूर सेवन करत होता. त्याने मंदिराच्या अंगणातच भांगची रोपे लावली केली. बाबा रामदेवने त्यांची व्यसनापासून मुक्तता करण्याचा होण्याचा निर्धार केला. त्यासाठी मंदिराच्या अंगणातील सर्व रोपे उपटून विहीरीत टाकली. त्यानंतर त्या बाबांनी मंदिरात कधीही रोप लावली नाहीत.