मुक्तपीठ टीम
देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ७५ किमीच्या आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी पदयात्रेचा प्रारंभ होत असून १४ तारखेला पदयात्रेचा समारोप होत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उद्या मंगळवारी सेवाग्राम येथून पदयात्रेचा शुभारंभ करणार आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मंगळवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी सेवाग्राम येथे वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या पदयात्रेत सहभागी होतील. बुधवार दिनांक १० रोजी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित शेगाव येथून पदयात्रेत सहभागी होतील, दि. ११ रोजी औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित पदयात्रेत ते सहभागी होतील, दि. १२ रोजी नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित पदयात्रेत सहभागी होतील तर दिनांक १३ रोजी नागपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित पदयात्रेत सहभाग घेतील आणि १४ तारखेला पुणे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित पदयात्रेत आगा खान पॅलेस येथून सुरु होणाऱ्या पदयात्रेत सहभागी होतील.
स्वातंत्र चळवळीतील काँग्रेस पक्षाचे योगदान व स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाच्या जडणघडणीत पंडित जवाहरलाल नेहरु ते डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने दिलेले योगदान याची माहिती जनतेला देण्याचा प्रयत्न या पदयात्रेतून केला जाणार आहे. स्वातंत्र्याच्या या गौरवशाली इतिहासाची आठवण या निमित्तीने केली जाणार असून नवीन पिढीला त्याची माहिती व्हावा यासाठी पदयात्रेत जनजागृती केली जाणार आहे.
आझादी गौरव पदयात्रेत काँग्रेस नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती लावणार आहेत.