मुक्तपीठ टीम
ऑस्ट्रेलियन सरकारने मान्यताप्राप्त लसींच्या यादीत कोवॅक्सिनचा समावेश केला आहे. एका मोठ्या देशाच्या मान्यतेनंतर आता डोळे लागलेत ते तीन नोव्हेंबरच्या WHOबैठकीकडे लागले आहेत. त्या बैठकीत नव्याने आलेल्या माहितीचा अभ्यास करून मान्यता दिली जाण्याची शक्यता आहे. ऐन दिवाळीत WHO गोड बातमी देईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे अनेकांचे रखडलेले परदेश दौरे शक्य होतील.
भारतात बनवलेल्या कोवॅक्सिन या कोरोना लसीला जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOने अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळे ती लस घेऊन लसवंत झालेल्या कोट्यवधी भारतीयांचा जीव टांगणीवर आहे. त्यातही लाखोंना काही प्रमुख देशांमध्ये जाणं शक्य नसल्यानं ते मोठ्या अडचणीत आले आहेत. मात्र, आता त्यांच्यासाठी दिलासा देणारी ही मोठी बातमी आहे.
ऑस्ट्रिलियाकडून दिलासा!
- भारत बायोटेकने बनवलेल्या कोवॅक्सिनला ऑस्ट्रेलियाने मान्यता दिली आहे.
- ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्चायुक्त बॅरी ओ’फेरेल यांनी ही चांगली बातमी दिली आहे.
- कोवॅक्सिनला ऑस्ट्रेलियन सरकारने मान्यता दिल्यामुळे आता WHOकडूनही लवकरच हिरवा कंदिल दाखवला जाण्याची शक्यता आहे.
कोवॅक्सिनला मंजुरीसाठी दीर्घ प्रतिक्षा!
- WHOकडून कोवॅक्सिनला मान्यतेसाठी अनेक महिने प्रतीक्षा केली जात आहे.
- या लसीला मान्यता देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने आणखी काही माहिती मागवली आहे.
- आणखी काही माहिती आवश्यक आहे, त्याआधारेच या लसीच्या वापरास मान्यता दिली जाऊ शकते.
- खरंतर २६ ऑक्टोबरच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत लसीला मंजुरी मिळणे अपेक्षित होते.
- आता ३ नोव्हेंबरला WHOची बैठक होणार आहे. या बैठकीत भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला मंजुरी मिळू शकते.
- याच वर्षी १९ एप्रिल रोजी भारत बायोटेकने जागतिक आरोग्य संघटनेकडे अर्ज केला होता.
- ही लस भारत बायोटेकने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या सहकार्याने विकसित केली आहे.
ऑस्ट्रेलियात कोणत्या लसींना मान्यता?
- कोविशील्ड लसीला ऑस्ट्रेलियन सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे.
- त्या बरोबरच फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन, सिनोव्हॅक, सिनोफार्म आणि आता भारत बायोटेक यांच्या लसींनाही मान्यता दिली आहे.