मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीतील काळा अध्याय आणि वेगळं वळण देणारी घटना म्हणजे ते मुख्यमंत्री असतानाची गुजरातमधील २००२ची दंगल. त्या दंगलीची हाताळणी करताना राज्यातील तत्कालिन मोदी सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप झाला. मोठ्या संख्येने सर्वसामान्यांचे बळी गेल्याने जगभर नाचक्की झाली. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदींना राजधर्म सांगितला. प्रजेत भेदभाव करु नये असा संदेश दिला.
तेव्हा भाजपाचे दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते. ते गुजरात दौऱ्यावर गेले. त्यांचा चेहरा तो संवेदनशील नेता व्यथित असल्याचे सांगत होता. पत्रकार परिषदेत त्यांच्या सोबत गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदीही होते. एका पत्रकाराने विचारले, तुम्ही मुख्यमंत्री मोदींना काही संदेश देणार का?
या प्रश्नाचे उत्तर भाषाप्रभू वाजपेयींनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत दिले. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना माझा एकच संदेश आहे, त्यांनी राजधर्माचे पालन केले पाहिजे…राजधर्म…हा शब्द बर्यापैकी अर्थपूर्ण आहे. मी त्याचं पालन करीत आहे. पालन करण्याचा प्रयत्न करीत आहे. राजासाठी, राज्यकर्त्यांसाठी, प्रजेमध्ये फरक असू शकत नाही. ना जन्माच्या आधारे, ना जातीच्या आधारे, ना संप्रदायाच्या आधारे.”
वाजपेयी जेव्हा राजधर्माचा संदेश देत होते, तेव्हा नरेंद्र मोदीही त्यांच्या शेजारी बसले होते. मध्यभागी नरेंद्र मोदी म्हणाले, ‘साहेब आम्हीही तेच करीत आहोत.’ त्यानंतर वाजपेयीजी पुढे म्हणाले, ‘नरेंद्र मोदी तसेच करत आहेत असा माझा विश्वास आहे.’
वाजपेयींनी का सांगितला होता राजधर्म?
नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये भजकलेल्या दंगलीत हजारोंचे बळी गेले. त्यात राज्य सरकारची यंत्रणा पक्षपाती वागत असल्याचे आरोप झाले. दंगलीत बळी गेलेल्यांमध्ये मुस्लिम धर्मीय मोठ्या प्रमाणात असल्याचा आरोप झाले. गुजरातमधील तत्कालिन मोदी सरकार भेदभाव करीत आहे असे आरोप झाले, त्यामुळे व्यथित झालेल्या संवेदनशील स्वभावाच्या पंतप्रधान वाजपेयींनी मुख्यमंत्र्यांना राजधर्म पाळण्याचा संदेश दिला, असे मानले जाते.
ही घटना आज का आठवली? कारण समजून घेण्यासाठी ही आजची बातमी वाचा:
सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींना सांगितला राजधर्म!