मुक्तपीठ टीम
देशात पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. तिथे निवडणूक प्रचारासाठी कसलेही निर्बंध न पाळता लाखोंची गर्दी जमवली जात आहे. उत्तरप्रदेशसारख्या राज्यांमध्ये धार्मिक कार्यक्रमांना हजारो जमत आहेत, पण तेथ कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत नाही. तो महाराष्ट्र, दिल्लीसारख्या राज्यांमध्येच का उफाळतो, अशी चर्चा सध्या सामान्यांमध्ये रंगताना दिसते. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी थेट तोच सवाल केला आहे की, “‘कोरोनाचे निवडणूक गर्दी होणाऱ्या राज्यांमध्ये संसर्ग होताना दिसत नाही. तेथे तो निष्प्रभ ठरतो आणि महाराष्ट्रातच का धुमाकूळ घालत असावा? महाराष्ट्र देशाबाहेर आहे का?”
महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग फैलावत आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट उसळली आहे. देशातील कोरोनाची सर्वाधिक प्रकरणेही महाराष्ट्रात आहेत. या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाश्वभूमीवर मुंबईचे पालक मंत्री मंत्री अस्लम शेख यांनी निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये प्रचारादरम्यान कोरोना नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणालेत की, त्यांना आश्चर्य वाटत आहे. महाराष्ट्र या देशाबाहेर आहे की काय की कोरोनाचे रुग्ण इथेच वाढत आहेत.
मुंबईत देशातील कोरोना रुग्णांच्या दहा टक्के रुग्ण आहेत. पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश व अन्य राज्यांत मोठ्या संख्येने लोक कार्यक्रमांमध्ये एकत्र येत आहेत. पण कोरोना संसर्ग महाराष्ट्रातच वाढतो. जेव्हा जेव्हा कोरोना संक्रमणाचा कम्युनिटी स्प्रेड होतो तेव्हा तो केवळ महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये दिसून येतो. त्यांनी विचारले की कोरोना विषाणू इतर राज्यात निष्प्रभावी आहे का?