रॉबिन डेव्हिडसन
लेक म्हणजे नकुशी. चक्क तेच नाव लेकीला देणारेही महाभाग आहेत. मात्र, त्याचवेळी सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्दमधील एका आजोबांनी आपल्या नातीच्या आगमनाचा अतिभव्य सोहळा साजरा केला. तिला पुण्याहून हेलिकॉप्टरनं गावात आणलं. तेवढंच नाही तर स्वागतासाठी ‘चला हवा येवू द्या’ या धमाल कार्यक्रमातील सेलिब्रिटी कलाकार हजर होते. एकूणच बेटी म्हणजे धनाची पेटी ही भावना आजही कायम असल्याचे आजोबा अशोक जाधव यांनी दाखवून दिले.
अशोक जाधव हे हिंगणागावचे सरपंचही आहेत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांना “मुलगी जपावी, ती मोठी व्हावी आणि समाजाला आदर्श बनावी” हा संदेश द्यायचा होता. त्यांनी आपल्या नातीचे स्वागत चक्क हेलिकॉप्टरने केलं. पुणे ते हिंगणगाव खुर्द असा त्यांनी आपल्या नातीला हेलिकॉप्टर प्रवास घडवला. नातीच्या स्वागत सोहळ्यास गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी ‘चला हवा येवू द्या’ कार्यक्रमातील प्रख्यात सेलिब्रिटी कलाकारही याठिकाणी उपस्थित होते. अशोक जाधव यांनी आपल्या एकुलत्या एक नातीवर प्रेम करुन महिलांविषयी कसा आदर बाळगावा हे या कार्यक्रमातून दाखवून दिले, अशी गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे.
कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द येथील सरपंच अशोक जाधव यांच्या एकुलत्या एक कन्या स्नेहा यांना कन्यारत्न झाले. या चिमुकल्या नातीला त्यांनी पुण्याहून चक्क हेलिकॉप्टरने आजोळी घरी आणलं आणि मुलीच्या जन्माचं स्वागत भव्य आणि अनोख्या पद्धतीने केलं.
असा झाला नातीच्या आगमनाचा दिमाखदार सोहळा…
- शनिवारी दुपारी चारच्या सुमारास सांगलीतील वांगी क्रीडा संकुलाच्या मैदानात हेलिकॉप्टर उतरले.
- सरपंच अशोक जाधव यांच्यासह कुटुंबीयांनी घरातील नव्या लक्ष्मीचं झोकात स्वागत केलं.
- कन्याजन्माचा आनंदही मोठ्या दिमाखात साजरा केला.
- अशोक जाधव यांना स्नेहा ही एकच मुलगी आहे.
- या मुलीचा विवाह २७ नोव्हेंबर २०२० रोजी कुंडल येथील दिग्विजय लाड यांच्याशी झाला.
- स्नेहा आणि दिग्विजय यांच्या संसरात २९ मार्च २०२२ रोजी लेकीचं आगमन झालं.
- अशोक जाधव आणि त्यांच्या पत्नी उषा या आजी-आजोबांनी आपल्या नातीचे भव्य स्वागत करायचे ठरवले.
- आई आणि मुलगी ‘हेलिकॉप्टर’मधून उतरले त्यावेळी त्यांचे पुष्पहार आणि हार घालून स्वागत करण्यात आले.
- नातीला हेलिकॉप्टरमधून खाली घेताच आजोबांनी तिला कवटाळून आनंद साजरा केला.
- बँड आणि झांज पथकाच्या निनादात भव्य मिरवणूकही काढण्यात आली.
- अशोक जाधव यांनी नातीच्या स्वागतासाठी गावातील रस्त्यांवर स्वागत कमानी उभारून फुलांची उधळण केली.