मुक्तपीठ टीम
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘फडणवीस सरकारच्या काळातच शिवसेनेकडून आघाडी सरकार स्थापनेचा प्रस्ताव आला होता आणि शिष्टमंडळात एकनाथ शिंदेंचा देखील समावेश होता, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. अशोक चव्हाणांच्या या गौप्यस्फोटाचे पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. त्यांच्या वक्तव्यावर शिवसेना नेते विनायक राऊत यांनी दुजारा दिला आहे. दुजोरा देताना कल्याण डोंबिवली प्रचार सभेत शिंदेंनी भाजपावर आगपाखड करत दिलेल्या फडणवीस मंत्रिमंडळातून राजीनाम्याची घोषणा करणाऱ्या व्हायरल क्लिपची आठवण ताजी झाली आहे. तर भाजपाकडून आमदार आशिष शेलार यांनी अशोक चव्हाणांना त्यांचीच क्लिप जाहीर करण्याचा इशारा दिला आहे.
काय म्हणाले अशोक चव्हाण?
- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली.
- शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी करत सत्ता स्थापन केली.
- पण सत्ता स्थापनेसाठी २०१४ मध्येच शिवसेनेकडून काँग्रेसकडे प्रस्ताव आला होता.
- विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदेही होते.
- आणि प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यास त्यावेळी सुचवलं होतं.
- त्यांची संमती असेल तर आमच्या पक्षातर्फे तुमच्या प्रस्तावाचा विचार करू, असे चव्हाण यांनी म्हटले.
- त्यावेळी अशोक चव्हाणांच्या चर्चगेट येथील कार्यालयात शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटलं होतं.
अशोक चव्हाणांची क्लिपच आम्ही जाहीर केली तर…
- अशोक चव्हाणांच्या या दाव्यावर आशिष शेलारांनी गंभीर इशारा दिला आहे.
- अशोक चव्हाणांची क्लिपच आम्ही जाहीर केली, तर त्यांची अडचण होईल.
- आमचे मित्र आहेत ते.
- त्यांची अडचण करण्याची आमची इच्छा नाही.
- काही राजकीय संदेश, प्रथा, परंपरा असतात.
- त्या प्रथा परंपरांचा आम्ही भंग करणार नाही.
- त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका-टिप्पणी करणार नाही.
- त्यांच्या राजकीय कृतीवर आम्ही नक्कीच बोलू शकतो.