Friday, May 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

घोडपदेवची माणसं

February 11, 2021
in featured, प्रेरणा
3
घोडपदेवची माणसं

अशोक भेके

घोडपदेव मधील अनेक बोळ वजा गल्ल्या आणि आडव्या उभ्या चाळी. पूर्वेला घोडपदेव मंदिर तर पश्चिमेला मारुती, दक्षिणेला बजरंगबली तर उत्तरेला शिवशंभो संरक्षक म्हणून स्थानापन्न आहेत आणि यामध्ये आपले जागृत देवस्थान श्रीकापरीबाबाचे मंदिर होय. सभोवताली काही अभूतपूर्व वाणाची माणसे राहतात. सर्वजाती जमाती आहेच शिवाय पुणेरी, सातारी, कोल्हापुरी, कोकणी आदि सर्वच जिल्ह्यातील ही म्हटली तर देवमाणसे आहेत, नाहीतर सिधी-साधी महापुरुष वजा अगडपगड माणसे. विश्वात्म्याने ही माणसे घडवताना एक वेगळीच आगळ्या धाटणीची मूस वापरलेली असणार, त्यामुळे त्यांची जडणघडण जगावेगळी अगम्य आहे. या माणसात लसणाची किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा, पोळा उसळ, सपक सांबार किंवा झणझणीत कालवण, कडू बाजरीच्या किंवा गोड ज्वारीच्या भाकरी, नाक्यावरची तिखट शेवपुरी असो वा वडापाव… लज्जतदार मिठाई किंवा तो मालपोवा या प्रमाणे सर्वच गुण आमच्या माणसात दिसून येतात. अरे कारे एकेरीपणाचे बोल अन डोळे वटारून उग्रट वाटणारे आणि थोरामोठ्यांची इज्जत करणारे हळव्या मनाचे आपुलकी प्रकट करणारे गुणदेखील ठासून भरलेले आहेत. माणूस जन्मत:च असाच असतो असे नव्हे तर त्याला इथल्या मातीत जीव वेडावणारे आणि जीव लावणारे कडूगोड संस्कार एकत्रितरीत्या मिळालेले आहेत का …!

पण एक काळ असा होता की, महादुशेठच्या हॉटेलातून मालपोवा किंवा पोळा उसळ खाल्याशिवाय दिवस सुरु होत नव्हता. दुध फाफडा आणि जिलेबी ही गिरणी कामगाराचे आवडते खाद्य. गरीबी होती आणि तेव्हा स्वस्ताई देखील पाहिली. शेणाँय नावाचा यांची लज्जतदार आणि गरमागरम साबुदाणा वडा, बटाटा वडा आणि झकास चटणी खाण्याकरिता जीव गुंतायचा. फायद्यासाठी धंदा केला नाही. आपल्या माणसांना जपणारी पिढी पाहिली. घोडपदेवचं नांव भल्याभल्यांनी घेतलेले आहे. शाहीर दादा कोंडके आपल्या लावणीतून वर्णन करतात तर आचार्य अत्रे आम्हांला अग्रलेखातून घोडपदेवचा पोळ म्हणून हिणवतात. चंद्रवदन, काळापहाड रहस्यकथेत आमचं नांव घेतल्याशिवाय काही सुचत नव्हते.

घोडपदेवच्या आज अस्तित्वात नसलेल्या चाळीवर प्रकाशझोत टाकला तर एक मनात भरलेली चाळ म्हणजे घोडपदेव नाक्यावरची राजू कामाठी चाळ. घोडपदेवची पहारेकरी. चाळीतल्या मजल्यावर उभं राहावं आणि संपूर्ण परिसर न्याहाळत राहावा. कुठे काय घडलं हे मजल्याला पहिले कळायचे. बुवा चाळ म्हणजे त्याकाळाचा नयनमनोहर नमुना. या चाळीत प्रांतानुसार विभागणी आढळत असे. अलीकडे घाटावरचे तर मागे कोकणातले. त्यात येथे सातारचे बैठकीचे गाळे अधिक प्रमाणात होते. आज मोकळ्या असलेल्या भूखंडावर बाबू गेनू नगरच्या चाळी होत्या. त्यांचे स्थलांतर इमारतीत झाले. भव्य चाळी अन ती भव्य घरे…. होती १०* १२ ची, पण अनेक कुटुंब सामावली जात होती.सहकुटुंब सहपरिवार येथे दिसून येत होता. पेटीवाला चाळ उभी पुणेरी ढंगाची चाळ. या चाळीला पेटीवाला का नांव पडले असावे, ठाऊक नाही. खोजा चाळ ही बुवा चाळी प्रमाणेच. येथे सामुदायिक मशेरी लावण्याचे ठिकाण बघायला मिळायचे. भिकीबिडी चाळ म्हणजे पक्का कोकण प्रांत. हिरजी भोजराज चाळ, जाफरभाई कानजी चाळ, चुनीलाल कंपाऊड, गांधीनगर इतिहास जमा झाल्या. पण या चाळी आजच्या बहुमजली इमारतींना भारी होत्या. आजच्या डायमंड बिल्डींग असो वा जाफरभाई कानजी चाळ, किंवा बाडावाला बिल्डींग असो वा वाळूंज चाळ असो…. येथे माणुसकी नांदत होती. माणूस येथे उपाशी झोपत नव्हता. एकदिलाने माणसं एकमेकांना सांभाळून घेत होती.
सुभाष लेन अशी एक चाळ. छोट्या छोट्या घरांची आटोपशीर होती. तिला रंगमंचावर प्रसिद्ध झालेल्या बटाट्याच्या चाळीचा नखरा नव्हता. आमच्या अशिक्षित सुशिक्षित माणसांचे बुद्धिवैभव येथे नांदत होते. लहान मुलांचे दुतर्फा चाळीच्या गल्लीत संसारगाड्याखाली दबलेल्याची मुलें खराट्याच्या काड्यांचे धनुष्य खांद्यावर, त्याच खराट्याच्या काड्यांचे बाण बनियनच्या भात्यात लटकवत दाटुमुटीची लढाई बघायला प्रत्यक्षात रामकृष्ण अवतरले असते तर त्यांनी देखील त्यांना नमन केल्याशिवाय राहविले नसते.

चास्कर चाळ म्हणजे अस्सल पुणेरी पट्टा. या चाळीचे तापमान अन्य चाळीपेक्षा वेगळे. कारण काही अंतरावर राणीबाग असल्याने तो दूडदूडत येणारा वारा माठातल्या पाण्याला देखील थंड गारीगार करीत असल्याने तेथील माणसं देखील शांत संयमी. विशेष या चाळीच्या बाहेर छोटेलाल हलवाई यांचे दुध माव्याचे हॉटेल. मस्तीला उधाण यायचे ते छोटेलाल मुलांच्या मागे डोळ्यावरचा चष्मा आणि पोट सांभाळत धूम ठोकायचा तेव्हा मात्र जबरदस्त धमाल वाटायची.

हफिजा बेगम नावाची चाळ. त्यामध्ये एकही मुसलमान नाही. पुणे सातारा जिल्ह्यातील माणसांची चाळ. एका बिऱ्हाडात केलेली खुसफुस दुसऱ्या बिऱ्हाडात इतकी सहज ऐकू जायची की, भिंतीना कान असतात हि म्हण मुळात चुकीची आहे कारण भिंतीना तोंडे देखील असतात असा संशय सहज मनात जागून उठायचा.

मारुती माळी चाळ म्हणजे टिपक्या टिपक्याच्या रांगोळी प्रमाणे संस्कृतीदर्शन घडविणारी घरे. कधी काळी याठिकाणी भाजीफुलांचा मळा होता. बगिछातील फुलांना हवं नको ते पाहत त्यांना फुलवावं असा प्रयत्न करताना मैत्रीच्या नात्यात गोडवा निर्माण करीत आई वडिलांनी भावा बहिणींनी लाड करावेत अशी चाळ. जागा किंवा साधनांची कमतरता असेल तरी आपले अंगण, आपले जीवन सुशोभित करत रहायचे. हा दिनक्रम हाताळताना ‘जुने ते सोने’ असले तरी सरसकट जुन्याला कवटाळून न बसता आधुनिकतेकडे वाटचाल करीत जगणारी माझ्या घोडपदेवची माणसं येथे पाहायला मिळतात. कांचबिल्डींग नावाची चाळ आहे. बैठी असली तरी बिल्डींग म्हणून सर्वपरिचित आहे. एका घरात दिलेली फोडणी दहा घरे पार करून घोंघावत जाणारा सुवास चहूदिशा नाकात अतिक्रमण करीत जातो. त्यामुळे दूरवर असलेले उंदीर देखील चढाई करून यावेत तसे आक्रमण करण्यासाठी येत असतात. कधी कौलावरून तर कधी जमिनीवरून… भागाबाईच्या घरात तळलेला पापलेट धोंडाबाई फक्त वासाने सांगायची.

ashok bheke
इथली सर्व माणसेच बहुगुणी आणि बहुमोली ! कलावंतही आहेत अन कलेची कदर करणारे आहेत. राजकारणी देखील आहेत अन राजकीय विश्लेषक देखील आहेत.कृष्णही आहेत आणि सुदामा देखील आहेत. डोक्यावर पिकलेले असो वा कंबरेत वाकलेला गडी असो पण अखेरपर्यंत तो ताठ कण्याने जगत असतो. ती लहाणपणी जशी असतात तशीच मोठेपणीही दिसतात, किंबहुना तशीच राहतात. फक्त त्यांच्या गुणात वाढ होते. अनुभवाचे ओझे घेऊन वावरत असतात. पाहुण्यारावळ्याचा आब राखतात म्हणून राबता देखील असतो. घोडपदेवचा माणूस वसई विरार रेल्वे प्रवास करणाऱ्यासारखा बेरकी तर नाही, कल्याणवासियाप्रमाणे घड्याळाच्या काट्यावर चालणारा नाही, ठाणेकरांसारखा रांगडाही नाही. पार्लेकरांसारखा गोष्टीवेल्हाळ नाही, डोंबिवलीकरांसारखा तोऱ्यात चालणारा देखील नाही, नव्यामुंबईकराप्रमाणे शीघ्रसंतुष्टीदेखील नाही. तो नेमका कसा आहे, हे सांगणे म्हणजे झाडावरची पानसंख्या मोजण्यासारखे क्लिष्ट काम आहे.लेखक नेहमी उडत्या पाखराच्या पिसांचे उदाहरण देतात. परंतु झाडावरची पाने हा घोडपदेवकरांचा मनपसंत विषय. घराच्या बाहेर तुळस वृंदावन येथे नसते. असते ती कुंडी. त्यात पाणी घालून घालून प्रेम करणारी आमची माणसं. वरवर भोळसट असेल पण व्यवहारचातुर्यात बाप आहे.

इथला माणूस फणसाच्या गऱ्यासारखा…! तो बाह्यांगी ओबडधोबड.. काहीसा काटेरी वाटतो. पण आतून मात्र मधाळ, अवीट गोडीचा, तोंडात घातले की, विरघळणारा, स्वत:ची वेगळीच चव जिभेवर रेंगाळत ठेवणारा, हवाबंद बरणीत ठेवला तर कित्येक दिवस टिकणारा, पोटभर खाणारा आणि पुरवून पुरवून खाणारा…. हा रसाळ फणस आयुष्यभर उन्हातानात उभे राहून आपल्या देहाचा गुलमोहर फुलवून त्याची शांत शीतल छाया दुसऱ्याला देणारा… माझा माणूस म्हणजे घोडपदेवची माणसे. गप्पिष्ट माणसं अमृततुल्य चहावर अंमळ जास्त ठेऊन जगतात तर मितभाषी काखेत पुस्तक घालून जेथे वेळ मिळेल तेथे वाचनालय सुरु करतात. अनेकांची बारसे जेवलेली ही मनमिळाऊ माणसे सर्वच विषयावर अधिकारवाणीने बोलत असतात. या माणसाना कधीही ‘कसे आहात तुम्ही…!’ एक उत्तर ठरलेले आहेच. ‘काही नाही, मस्त निवांत आहे …!’ हे ठोकळेबाज उत्तर इथल्या संवादाचा मूळ गाभा आहे.दिवसभर काबाडकष्ट करून रात्रीच्या वेळी घोडपदेवच्या नाक्यावर सोडियम व्हेपरच्या फिकट पिवळसर उजेडाखाली हाताची घडी घालून, अधून मधून पोट किंवा डोके खाजवत ओशाळलेल्या चेहऱ्यातील ज्येष्ठांना असा प्रश्न विचारला तर ते अगदी आरामात पोटावरून वा खरमूडया गालावरून वा दाढीच्या वाढलेल्या खुंटावरून हात फिरवीत ‘निवांत’ उत्तर देणार !!

घोडपदेवची माणसं फार धार्मिक नव्हती पण मूर्तिभंजकदेखील नव्हती. कुणाकडे गजानन महाराजांची पोथी वाचली जायची तर कुणाकडे नवनाथ भक्तीसार. कुणाकडे खंडोबाची तळी भरली जायची तर कुणाकडे आठवले शास्त्री बुवांचा स्वाध्याय चालायचा, कोणी नाना धर्माधिकारी समर्थ बैठकांच्या अधीन, तर कोणी राधास्वामी तर कुणी बाबा गुरु बचनसिंग (हरदेवसिंग) यांच्या पठण्या वदत असे. जो तो आपापल्या कुळाचाराला धरून होता आणि दुसऱ्यांच्या कुळाचाराबद्दल कुणाला काही आक्षेप नव्हते. खाण्यापिण्याबाबतचे एकमेकांचे स्वातंत्र्य सगळ्यांना मान्य होते. लोक एकमेकांना धरून होते. कुणी कुणाकडून उधार-उसनवार घेत नव्हते त्यामुळे फसवाफसवीचा प्रश्न नव्हता.घेतले तरी पुन्हा परतफेड हा धर्म बिनबोभाट होत असे. भांडणेदेखील क्वचितच व्हायची पण तात्पुरती काहीदिवस अबोला तर पुन्हा येरे माझ्या मागल्या. तुझ्या शिवाय करमत नाही.. आणि माझे मन तुझ्या शिवाय रमतच नाही.

इथली तरुण मंडळी तर रस्त्याचा वापर विमानतळाच्या धावपट्टीप्रमाणे करताना दिसतील आणि चुकून कुणाला धक्का लागलाच तर सौजन्याची मूर्ती दिसून येतात. हल्ली एक बरे दिसत आहे.महिलावर्ग दुचाकीचा वापर करू लागले आहेत. भाजी खरेदीसाठी असो वा मुलांना शाळेत ने आण करताना दिसतात किंबहुना बऱ्याच कामाचा पुरुषी भार उचलला आहे, पण त्यांच्यामुळे चप्पलांच्या दुकानांना तेजी आलेली आहे. विशेषत: आपले तरुण आईबापावर जेवढे प्रेम करतात तेवढेच प्रेम आपल्या बायकोवर करतात. त्यात कमी अधिक प्रमाण आढळत नाही.मुलाबाळांचे हवे तेवढे कोडकौतुक करणारे आहेत.तर बायकोने हॉटेलात जाऊन काही तरी खाऊ असा विषय काढताच राणीबागच्या पाणीपुरीवाल्याच्या ठेल्यावर कशी मस्त, चविष्ट पाणीपुरी मिळते हे पटवून पटवून सांगणारे आपल्या खिश्याला काटकसर कशी करायची हे सुचवितात. कुठे बाहेरगावी गेले तरी जीव घरी ठेऊन जाणारी माणसं येथेच आढळतात. कापरेश्वर महाराजांच्या मंदिरात भक्तिभावाने डोळे मिटणारे, नवरात्रीत अनवाणी पायाने उपवास करीत भल्यापहाटे महालक्ष्मीच्या दर्शनाला चालत जाणारे, स्वत:पेक्षा जगाची काळजी करणारे, शेजारी-पाजारी मयत झाले तर आपल्याच घरातले कोणीतरी गेले या भावनेतून ओले डोळे पुसणारे, ओलेत्या डोळ्यांनी अन गदगदनाऱ्या मनानी दु:खिताच्या खांद्यावर आधाराचा हात टाकणारी मायेची माणसं माझ्या घोडपदेव मध्ये आढळतात.
मी अशी माणसं पाहिली की, मनमोकळ्या स्वभावाची, हळव्या मनाची आहेत. शांत स्वभावाची असतात. प्रसंगी वज्राहून कठीण होणारे तर कधी मेणाहून मऊ दिसणारे, परंतु त्यांना कधी भडकलेले पाहिले की ज्वालामुखीतला धगधगता लाव्हा बाहेर पडत आहे, असे क्षणभर वाटते. पण आपल्या माणसांचे वय कितीही असो पण सदानकदा ते हिरवट दिसतात. नाही ते हिरवट बनून राहतात. वरातीत वा मिरवणुकीत देहभान हरपून नाचणाऱ्या लेकाचं कौतुक गर्दीत उभा असणारा बाप ‘ तो माझा मुलगा आहे.’ किती कौतुकाने सांगत असतो. इथल्या हिरवट म्हाताऱ्याच्या मनगटात रग आणि ओठात जरब असते. वेळप्रसंगी सगळी आयुधे गुंडाळून पांढरे निशाण फडकवीत समजावणीचा सूर आळवितो.जगतात मात्र बुध्दिबळातल्या वजीरासारखी… बादशहाला किंवा राजाला भीती वजिराची असते म्हणून भलेभले पंगा घेत नाहीत. घोडपदेवने अनेक बदल पाहिले. अजून गांगरलेले नाहीत ती आमची माणसं. उलट बदलांना सामोरी जाताहेत.
घोडपदेवच्या मातीवर प्रेम करणारा अन मातीत पाय रोवून आकाशाला गवसणी घालण्याचे लक्ष्य ठेवणारा घोडपदेवचा माणूस सर्वासाठी आयडॉल राहिला आहे. माझा माणूस कुठेही गेला… दौऱ्यावर असलातरी त्याची एकच इच्छा असते की, ‘इथल्या मातीतच शेवटचा दिस गोड व्हावा……!’

 

ashok bheke

(अशोक भेके हे बॅक ऑफ इंडियाचे माजी कर्मचारी आहेत. जन्मापासून मुंबईतील घोडपदेव मध्येच वास्तव्य, लहानपणापासून वाचन आणि लेखनाचा छंद, अनेक वर्तमानपत्रात लेखन केले आहे. अशोक भेके यांना सामाजिक समस्या आणि प्रासंगिक बाबींवर लेखन करायला आवडते.)


Tags: अशोक भेकेघोडपदेवव्हा अभिव्यक्त
Previous Post

#मुक्तपीठ गुरुवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post

चक्का जामनंतर आता शेतकरी उतरणार रेल्वे रुळावर

Next Post
Farmer

चक्का जामनंतर आता शेतकरी उतरणार रेल्वे रुळावर

Comments 3

  1. सचिन चौगुले says:
    4 years ago

    खुप छान माहिती आणि वर्णन, वाचून आठवणी ताज्या होतात, धन्यवाद अशोक भेके सर

    Reply
  2. Hemant chandrakant pedgulkar says:
    4 years ago

    खूप छान लेखन आहे घोडपदेव विभागाचे …आवडलं दिलं खुश

    Reply
  3. उमेश गजानन मुरकर says:
    4 years ago

    अशोक जी खूपच छान अशी माहिती चे संकलन करून अभ्यासपूर्वक पद्धतीने मांडली आहे. माझे वडील गजानन यशवंत मुरकर हे घोडपदेव मध्येच लहानाचे मोठे झाले. व कित्येक सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
    खालील लिंक मध्ये आपणास त्या बद्दल माहिती मिळेल. 🙏. http://www.sskka.com/gajananmurkar.html

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!