मुक्तपीठ टीम
महाविकास आघाडीमध्ये सगळं हास्यास्पद सुरु आहे. मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर महत्त्वाचे मुद्दे नीट मांडले नाहीत. आता कोणत्याही प्रकारची चर्चा, बैठक न घेता राज्यपालांना निवेदन दिले. ही मराठा समाजाची दिशाभूल आहे. राज्याचे मुख्यमंत्री समाजाला एप्रिल फूल कऱण्याचा कार्यक्रम करु नका, अशा शब्दात भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आघाडी सरकारच्या कारभाराचा समाचार घेतला.
भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आरक्षणाचं नंतर मिळाले तरी चालेल, समाजाला सवलती द्या अशी भूमिका घेतली. आणि काल तेच मंत्री राज्यपालांची भेट घेऊन आरक्षण द्या अशी मागणी करतात. काँग्रेसच्या या अशा भूमिकांमुळे आता तुम्हाला आरक्षण नक्की द्यायचं आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. हे सरकार मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सुसूत्रता नाही. द्विधा मनस्थितीत काँग्रेस असून न्यायालयात हीच व्दिधा मनस्थिती घातक ठरली. मागासवर्ग आयोगात मराठा समाजाची जी स्थिती अधोरेखित केली ती असाधारण स्थिती दमदारपणे मांडायची कि सर्वोच्च न्यायालयाच्या फुल बेंचने दिलेला इंद्रा सहानी हा निकाल कालबाह्य झाला हे मांडायचे? याबाबत राज्य सरकार व्दिधा मनस्थितीत राहिले त्यामुळे मराठा समाजाची बाजू खंबीर पणे मांडली गेली नाही, अशी टीका आमदार अँड आशिष शेलार यांनी यावेळी केली.
मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीची होती का प्रश्न पडतोय. तसेच योग्य नियोजन आणि अभ्यास न करता राज्यपालांना निवेदन दिले आहे. राज्यपालांना निवेदन देण्याआधी तज्ञांच्या समितीचे मत जाणून घेतले नाही. विरोधी पक्षाशी चर्चा केली नाही. विधानसभेत चर्चा झालेली नाही. मराठा समाजाच्या संघटनांशी चर्चा केली नाही. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची तयारी न करता राज्यपालांना निवेदन देऊन मराठा समाजाची फसवणूक राज्य सरकार करते आहे. मराठा समाजाला कृपया एप्रिल फुल्ल करु नका, असे ही आमदार अँड आशिष शेलार म्हणाले.
तेव्हाच्या कँबिनेटमध्ये तुमच्या पक्षाचे मंत्री होते ना?
तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलेला कायदा फुलप्रुफ नव्हता असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आज वाटते आहे. पण तेव्हाच्या फुल कँबिनेटमध्ये तुमच्या पक्षाचे मंत्री होते ना? त्यावेळी फुल सहमती तुमची घेतली होती ना? मग आज कायदा फुलप्रुफ होता कि नाही हा प्रश्न हा नाही. प्रश्न. हा आहे की, न्यायालयात जेव्हा बाजू मांडली तेव्हा मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाचे फुल अनुवाद तुम्ही का केलात नाही? या गायकवाड अहवालाच्या बाजूने फुल आर्ग्युमेंट तुम्ही का केले नाही? हे प्रश्न आज मराठा समाजाच्या मनात आहेत.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दिलेले आरक्षण आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फुलप्रुफ वाटत नाही मग…तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने केवळ एक समिती गठीत करुन दिलेले आरक्षण फुलप्रुफ वाटते का? असा सवाल आमदार अँड आशिष शेलार यांनी केला.
नाना पटोले हे काँग्रेसचे विनोदी कलाकार अध्यक्ष
नाना पटोलेंच्या रुपाने महाराष्ट्रात एका पक्षाला विनोदी कलाकार अध्यक्ष लाभले आहेत. ते अनेक विनोद करीत असतात. त्यांच्या आजपर्यंत झालेल्या कोणत्याही पत्रकार परिषदेचे विषय मोदी, मोदी आणि मोदी आहेत. मग आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विषयी बोलले तर तुम्हाला राग का येतो? त्यामुळे नाना पटोले हे विनोदी कलावंत आहेत त्यांना गांभीर्याने घ्यायचे कारण नाही.