मुक्तपीठ टीम
मी जर मुख्यमंत्री असतो तर महिलांची बदनामी करणाऱ्या मंत्र्यांला मंत्रिमंडळातून लाथ मारून बाहेर काढलं असतं, असं उद्धव ठाकरे काल म्हणाले. मी विचार केला खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर प्रथम क्रमाकांचे बक्षिस उद्धव ठाकरेंना मिळेल. इतके धादांत खोटे बोलतात. महिलांचा अपमान कुणीच करु नये, आम्ही त्याचा निषेध करतो. पण महिलेच्या अपमानामुळे मंत्र्याला काढून टाकावे, असे उद्धवजींना वाटतं, त्यांच्या मंत्रिमंडळात मात्र एक मंत्री दाऊदच्या बहिणीबरोबर व्यवहार करतो. काळा पैशाने तिची प्रॉपर्टी विकत घेतो, तोच काळा पैसा बॉम्बस्फोटात वापरलो जातो, असे एएनआय म्हणते. त्या मंत्र्याला काढावेसे उद्धव ठाकरेंना वाटले नाही? अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला.
सहकार आणि शिक्षक आघाडीच्यावतीने दहीसर पूर्व येथे जागर मुंबईचा या अभियानांतर्गत १७ वी सभा संपन्न झाली. या सभेला आमदार प्रवीण दरेकर, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, सहकार आघाडीचे मुंबई उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, जे. पी. मिश्रा, नगरसेवक जगदीश ओझा, शिक्षक आघाडीचे अध्यक्ष राजेश बंडगर, माजी नगरसेवक नागेश कवठणकर, विधानसभा अध्यक्ष अरविंद यादव उपस्थित होते. लांगूलचालन करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धवजींमुळे महेक प्रभू नावाची मुलगी गेट वे ऑफ इंडियाला उभी राहून फ्री काश्मीरचे पोस्टर घेऊन उभी राहते. तिच्यावर साधी एनसी देखील झाली नाही. आमच्या गल्लीबोळात १० नंतर बँजो वाजवला तर पोलिस येऊन गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतात पण तिथे महेक सारखी मुलगी काश्मीर तोडण्याचे फलक दाखवते मात्र तिच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
सर्जिल उस्मानी सारखा सडक्या मेंदूचा माणूस महाराष्ट्रात येऊन हिंदू धर्माचा अवमान करतो. त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून आम्ही मागणी करतो. पण लांगूलचालन करणारा मुख्यमंत्री असल्यामुळे सर्जिल उस्मानीवर गुन्हा दाखल केला नाही.
हिंदूमध्ये फूट पाडण्याचे जे काम मोहम्मद गझनीला जमले नाही, ते काम उद्धव ठाकरे करत आहेत
आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, २२ ऑक्टोबरला सामनामध्ये मराठी मुस्लिमांचे आम्ही स्वागत करत आहोत असे लिहिले गेले. आम्ही कुठल्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नाही आहोत. आम्ही ‘सबका साथ सबका विकास’ आहोत. तुष्टीकरण्याच्या आणि लांगुलचालनाच्या विरोधात आम्ही आहोत. मुस्लिम मराठी अशी मांडणी केली जात आहे. मराठी गुजरातीला विरोध का? मराठी जैनच्या विरोधात उभे का राहता? मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाहीत? मराठी हिंदू या शब्दांशी तुमचे वैर का आहे? असा सवाल ॲड. आशिष शेलार यांनी केला.
मुस्लिम मतांचे राजकारण करण्यासाठी उद्धवजी ठाकरे यांच्याकडून आफताब – श्रद्धा वालकरच्या प्रकरणात साधा निषेधही व्यक्त करण्यात आलेला नाही. मराठी आणि मुस्लिमांना फसवण्याचे काम उद्धवजींच्या सेनेकडून सुरू आहे. हिंदू मराठी आणि मुस्लिम मते भारतीय जनता पार्टीला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही कुठल्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नाही आहोत. आम्ही ‘सबका साथ सबका विकास’ आहोत. तुष्टीकरण्याच्या आणि लांगुलचालनाच्या विरोधात आहोत. हिंदुत फूट पाडण्याचे काम सुरू आहे ते कधीही यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिला.