मुक्तपीठ टीम
आर्यन खानच्या जामिनाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरु आहे. दरम्यान आर्यन खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात अतिरिक्त मुद्दे मांडताना एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिकांमध्ये होत असलेल्या आरोपांशी आणि प्रत्यारोपांशी आर्यन खानशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे. तसेच आर्यन खान याने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जामीन याचिकेला एनसीबीने मंगळवारी विरोध केला आहे. एनसीबीने आरोप केला आहे की आर्यन फक्त ड्रग्सच घेत नाही तर तो अवैध ड्रग्ज तस्करीतही सामील होता.
आर्यन खान ड्र्ग्सप्रकरणाला वेगळं वळण आले आहे. आर्यन खानवर कारवाई करणारे समीर वानखेडेंवर नवाब मलिकांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावेळी आर्यन खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात अतिरिक्त मुद्दे मांडले आहेत, ज्यामध्ये एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि काही राजकीय व्यक्तींमध्ये होत असलेल्या आरोपांशी आणि प्रतिआरोपांशी त्याचा आर्यन खानशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे.
दुसरीकडे एनसीबीने आर्यन खान आणि शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी नावाची एक महिला पुराव्यांसोबत आणि साक्षीदारांशी छेडछाड करत असल्याचा दावाही केला आहे.
आर्यन खानने दाखल केलेल्या जामीन याचिकेवर एनसीबीने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. न्यायमूर्ती एनडब्ल्यू सांबरे यांच्या एकल खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी नंतर होण्याची शक्यता आहे.
एनसीबीने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, या प्रकरणाच्या तपासात छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रतिज्ञापत्रात पूजा ददलानी यांचाही उल्लेख करण्यात आला असून, या महिलेने तपास सुरू असताना पाच साक्षीदारांवर प्रभाव टाकल्याचे दिसते. जामीन अर्ज चुकीचा असल्याचे एनसीबीने म्हटले आहे.
एनसीबीने न्यायालयाला सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात आर्यन खानची ड्रग्सची अवैध खरेदी, वाहतूक आणि सेवन यात भूमिका उघड झाली आहे. प्रथमदर्शनी तपासात असे दिसून आले आहे की, आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंटकडून ड्रग्स खरेदी करत असे, जो या प्रकरणातील आरोपी देखील आहे.
“अर्जदार (आर्यन खान) परदेशातील काही व्यक्तींच्या संपर्कात होता जे ड्रग्सच्या बेकायदेशीर खरेदीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग नेटवर्कचा भाग असल्याचे दिसते,” असे याचिकेत म्हटले आहे. आर्यन खानकडून ड्रग्स सापडले नसले तरी तो या कटात सहभागी झाल्याचे शपथपत्रात पुढे म्हटले आहे.
“एनडीपीएस कायद्यांतर्गत बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या तस्करीसह गंभीर गुन्ह्यांमध्ये या अर्जदाराची (आर्यन खान) भूमिका स्पष्ट आहे. या प्रकरणात त्याचा इतर आरोपींशी संबंध आढळून आले आहेत,” असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. एनसीबीने सांगितले की, इतर आरोपींकडून माफक प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले आहे आणि त्यामुळे आर्यन खानच्या प्रकरणाकडे वेगळे पाहिले जाऊ शकत नाही. एनसीबीनेही या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले. आरोपपत्र दाखल करणे आवश्यक आहे.