मुक्तपीठ टीम
मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधातील दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनाचा प्रतिसाद कमी झालेला असला तरी शेतकरी आंदोलकांच्या मनातील संताप धगधगताच असल्याचे दिसून येत आहे. या संतापातून कृषी कायद्याचा विरोध करणारे काही शेतकरी आता कायदे हातात घेऊ लागले आहेत.
कृषी कायद्यांबदद्ल भूमिका मांडण्यासाठी आलेल्या भाजपाच्या एका आमदाराला शेतकरी आंदोलकांनी नुकतीच केलेली मारहाण त्या संतापाचेच निदर्शक मानली जात आहे.
शेतकऱ्यांनी पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील मलोटमध्ये भाजप आमदार अरुण नारंग यांना बेदम मारहाण केली आहे. या घटनेत अरुण नारंग यांचे कपडे फाटले असून, त्यांना दुखापतही झाली आहे. अरुण नारंग अबोहरचे आमदार आहेत.
शेतकऱ्यांकडून भाजप कार्यालयाची तोडफोड
अरुण नारंग कृषी कायद्याच्या समर्थनार्थ एक पत्रकार परिषद घेण्यासाठी मलोटला आले होते. शेतकऱ्यांना त्यांच्या येण्याची बातमी कळताच शेकडो शेतकरी मलोटमधील भाजप कार्यालयाच्या बाहेर जमा झाले. शेतकरी जमा होताना दिसताच पोलिसांनी अरुण नारंग यांना सुखरुप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण शेतकऱ्यांनी पोलिसांच्या हातून अरुण नारंग यांना खेचले आणि कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. यानंतर पोलिसांनी कसेबसे नारंग यांना एका दुकानात नेले. यानंतर शेतकऱ्यांनी त्या दुकानाबाहेर घोषणाबाजी करत नारंग यांच्या गाडीची तोडफोड केली.
थोड्या वेळाने पोलिसांनी नारंग यांना दुकानातून बाहेर काढले. शेतकरीही त्यांच्यामागे धावले. हे पाहून आमदार आणि नेते आपला जीव वाचवण्यासाठी वेगात धावू लागले. पोलिसांनी चिडलेल्या शेतकर्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही बाजूंनी संघर्ष सुरू झाला. दरम्यान, शेतकर्यांनी आमदाराला पकडले आणि त्यांची मारहाण करत कपडे फाडले. त्यानंतर कशी तरी पोलिसांनी आमदाराची सुटका करून घेतली व ते आपल्यासमवेत घेऊन गेले.
मुख्यमंत्र्यांकडून निषेध
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी आमदार नारंग यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला आहे. अशा प्रकारे कायदा हाती घेण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे.