मुक्तपीठ टीम
“वेगवेगळ्या विषयांची गोडी, ध्यास असलेल्या डॉ. विकास आबनावे यांचा व्यासंग दाद देण्यासारखा होता. खोलात जाऊन अभ्यास करण्याची त्यांची वृत्ती होती. वेगळ्या स्वरूपाची मांडणी करणारे समाजकारणी होते. राजकारणाच्या पलीकडचे समाजकारण ते करत असत. त्यांचे व्यक्तिमत्व ज्ञानी समाजकारणी असे होते,” अशा भावना ज्येष्ठ संपादक पत्रकार अरुण खोरे यांनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव दिवंगत डॉ. विकास आबनावे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित अभिवादन सभेत अरुण खोरे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे मानद अध्यक्ष मोहन जोशी, खजिनदार प्रथमेश आबनावे, सहसचिव पुष्कर आबनावे, सदस्य गौरव आबनावे, प्रज्योत आबनावे, माध्यम सल्लागार जीवराज चोले, शीतल आबनावे आदी उपस्थित होते.
डॉ. विकास आबनावे फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. ‘नॅशनल असोसिशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज’ या संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी २० गाद्या, चादरी, उशा देण्यात आल्या. यावेळी संस्थेचे संस्थापक राहुल देशमुख, पुणे शहर काँग्रेसचे प्रशांत सुरसे, संस्थेचे पॅट्रोन शीतल आबनावे, भागुजी शिखरे, विकास दळवी आदी उपस्थित होते.
राघवेंद्र स्वामी मठ, निवारा वृध्दाश्रम येथे अन्नदान, मेक न्यू लाईफ संस्थेला प्राण्यांसाठी औषधे व इंजेक्शन्स, महर्षीनगरमध्ये ५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच संस्थेच्या चार शाखांमधील प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात आले.
मोहन जोशी म्हणाले, “डॉ. विकास आबनावे आपल्यात नाहीत, असे वाटतच नाही. त्यांचे अस्तित्व आजूबाजूला चालू असलेल्या कामातून जाणवत राहते. त्यांचे विचार, संस्कार, शिकवण व कामाची परंपरा अविरतपणे जपली जात आहे, याचे समाधान वाटते.”
प्रथमेश आबनावे म्हणाले, “डॉक्टरांच्या विपुल लेखनाचा संग्रह व त्यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या स्मृतिग्रंथातून त्यांच्या अभ्यासाचे विषय आणि आवाका लक्षात येतो. त्यांच्याकडून आम्ही समस्यांना तोंड द्यायला शिकलो आहोत. लोकांना जोडण्याची शिकवण त्यांनी दिली.”
पुष्कर आबनावे म्हणाले, “अडचणीतून पुढे कसे जावे हे त्यांनी शिकवले. त्यांचा वारसा तसाच पुढे चालू राहील. सहवास संपला असला तरी विचार, आचार आणि संस्कार आयुष्यभर पुरतील. या वटवृक्षाच्या सावलीत कोणतीच अडचण येणार नाही याची खात्री आहे.”
जीवराज चोले यांनीही मनोगत व्यक्त केले. सुनिता ननावरे यांनी सूत्रसंचालन केले. गौरी पास्ते यांनी आभार मानले.