उदयराज वडामकर / कोल्हापूर
गणपती बाप्पा मोरया…या जयघोषानं आसमंत दणाणतो. चौफेर उत्साह संचारतो. लाडक्या बाप्पाचा उत्सव आणि उत्साह ठरलेलाच. गणेश चतुर्थीला बाप्पाचं आगमन होण्यापूर्वीच घरोघरी उत्सवाची तयारी सुरु आहे. बाजारपेठांमध्येही उत्सवी उत्साहाला उधाण आलंय.
बाप्पा मोरयाचा मंगलघोष प्रत्येकाच्या तोंडी…दर्शनाची आतुरता. मोदकांचा नैवेद्य. आरतीची वेळ. सारं काही मनाला भावणारं. गणेश चतुर्थी अगदी जवळ आलीय. बाप्पाच्या आगमनाचे वेध लागलेयत. कुंभारवाड्यामध्ये दिवस-रात्र मूर्ती निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यातील कामांची लगबग सुरूच आहे. ऑर्डर प्रमाणे परगावच्या गणपती मूर्ती आधीच रवाना झाल्या आहेत. काही स्थानिक मंडळांनीही मोठ्या श्री गणेश मूर्ती नेण्यास सुरुवात केली आहे. उत्सवासाठी लागणाऱ्या सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारांमध्ये गर्दी उसळत आहे.
कोल्हापूर शहरात शाहूपुरी कुंभार गल्ली ,पापाची तीकटी रूनमुक्तेश्वर परिसरातील कुंभारवाडी यासह बापट् कॅम्प, मार्केट यार्ड उपनगर व ग्रामीण भागासह कुंभारवाड्यांमध्ये दिवस-रात्र धावपळ सुरू आहे. घरगुती तसेच सार्वजनिक श्री गणेश मूर्तीची कामे करण्यात कुंभारवाडा गर्क झालेयत. गौरी (पार्वती) आणि शंकराच्या मुर्तीही आतापासूनच सजवून विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत.
काही ठिकाणी मूर्तीवर शेवटचा हात मारण्याची लगबग सुरू आहे. श्री गणेशाची मूर्ती पूर्ण रंगवून झाल्यावर शेवटचा हात असतो तो डोळे व भुवई रेखाटण्याचा. ते काम अत्यंत महत्त्वाचे असते. या रेखीवपणामुळे मूर्तीला जिवंतपणा येतो. हे काम करणारी कारागिर मंडळी खास कसबी असतात. एक दिवसात साधारणत: कसबी कलाकार डोळे रेखीव करण्याचे काम शंभर ते दीडशे मूर्तींवर करतात. तसेच मोठ्या मूर्तीही ३० ते ४० होत असतात या कसबी कारागिरांना सध्या मागणी फार वाढली आहे.
पूजेचे साहित्य तसेच प्रसादाचे साहित्य, आरास साहित्य, फुले, उद, कापूर, अगरबत्ती, अत्तरे यांच्या दुकानांमध्येही आता खरेदी करण्याची गर्दी होऊ लागली आहे. एकंदरीतच गणपती बाप्पाचे आगमन जवळ आलं आहे, तसा चौफेर उत्साह संचारताना दिसत आहे. बाप्पाचं हेच वैशिष्ट्य…बाप्पा जिथं जिथं येतात…तिथं तिथं उत्साहाला उधाण येतं! आतापासूनच त्याची प्रचिती अनुभवास येतेय…
गणपती बाप्पा मोरया…