मुक्तपीठ टीम
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मौजे काष्टी, ता. मालेगाव जि. नाशिक येथे कृषि विज्ञान संकुलात यापूर्वी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय व वर्ष २०२१-२२ पासून अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय सुरु करण्यात आली आहेत. आता शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान ही तीन महाविद्यालये सुरु करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले, कृषि विज्ञान संकुलांतर्गत कृषि शिक्षणाबरोबरच कृषिपूरक उद्योग विकास, प्रक्रिया केंद्र, शेतकरी प्रशिक्षण केंद्र व सुविधा केंद्र, आदर्श रोपवाटीका संकुल, सर्व कृषि निविष्ठांचे संशोधन व निर्माण केंद्र इत्यादी कृषिविषयक उपक्रम विकसित करण्याचे नियोजन आहे. या संकुलामुळे नाशिक जिल्ह्यात एकत्रितरित्या कृषि शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध होतील. कृषि पदवीधरांच्या माध्यमातून विविध ठिकाणी कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार करणे तसेच ग्रामपातळीवरील विस्तार कार्यकर्ते, ग्रामसेवक, कृषि मदतनिस, तज्ज्ञ प्रशिक्षक, कृषि संशोधक व आधुनिक शेतकरी यांना सहाय्य करुन देशाच्या कृषि क्षेत्रात मौल्यवान योगदान देणे, कृषि आधारित स्टार्टअप अंतर्गत उद्योग सुरु करण्यास मदत करणे आदी बाबी साध्य होण्यास मदत होणार आहे.
कृषि महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालय या महाविद्यालयांची विद्यार्थी प्रवेशक्षमता प्रत्येकी ६० विद्यार्थी असून अभ्यासक्रमाचा कालावधी ४ वर्षाचा आहे. तसेच कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाची प्रवेशक्षमता ४० विद्यार्थी असून अभ्यासक्रम कालावधी ४ वर्षाचा आहे. या महाविद्यालयांच्या निर्मितीकरीता अंदाजे रु. ४९० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत शेततळ्यास अनुदान मर्यादा वाढवली
वाढती महागाई व डिझेलच्या दरात झालेली वाढ यासारख्या विपरीत परिस्थितीमुळे शेततळे खोदकाम करून जलसंचय करणे हे शेतकरी बांधवांना खर्चिक ठरत होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेततळे अनुदानाची मर्यादा ५० हजार रुपयांवरून ७५ हजार रुपये करण्यात आली आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले, राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी शासनाने शेतकऱ्यांचे हित नजरेसमोर ठेवून अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले आहेत. राज्यात कोरडवाहू क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता, टंचाई परिस्थितीत शेतकरी बांधवांना पीक जगवणे जिकीरीचे ठरत होते. यापूर्वी शेततळे खोदकामासाठी ५० हजार रुपये अनुदान देण्यात येत होते. आता हे अनुदान ७५ हजार रुपये इतके देण्यात येणार आहे. या शेततळे योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी बांधवांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. प्रतिकूल हवामान परिस्थितीतही शेतकरी बांधवांनी शेततळे व त्यावर आधारित फळबाग लागवड ही शेतीपद्धती आत्मसात करून कृषि निर्यातीत महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेले असल्याचेही दादाजी भुसे यांनी सांगितले.