मुक्तपीठ टीम
भारतीय मोबाइल यूजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. सरकारच्या देशाला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यासाठीच्या पीएलआय योजनेला यश मिळत आहे. अॅप्पल आणि सॅमसंग हे लोकप्रिय ब्रँड मोठ्या प्रमाणावर भारतातच उत्पादन करून जगभर निर्यात करत आहेत.
अॅप्पल आणि सॅमसंग चालू आर्थिक वर्षात देशात ३७ हजार कोटी किंमतीचे स्मार्टफोन बनवत आहेत. हे केंद्राने ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ५० टक्के अधिक आहे. भारतात तयार होणाऱ्या ३७ हजार कोटी रुपये किंमतीच्या स्मार्टफोनपैकी सुमारे ३ अब्ज डॉलर किंमतीचे स्मार्टफोन निर्यात केले जात आहेत. पीएलआय योजनेंतर्गत पाच वर्षात कंपन्यांना ३९ हजार कोटी रुपयांचे प्रोत्साहन दिले जाईल. भारताला उत्पादन केंद्र बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
पीएलआय योजना आहे तरी काय?
- भारत सरकारने उत्पादन-आधारित प्रोत्साहन योजना म्हणजेच पीएलआय सुरु केली आहे.
- भारताला उत्पादन केंद्र बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी पीएलआय योजना २०२५-२६ पर्यंत वाढवली.
- तसेच योजनेचे आधार वर्ष २०१९-२० एवढेच ठेवण्यात आले आहे.
- इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे अध्यक्ष पंकज मोहिंद्रू म्हणाले की, विस्ट्रान आणि पेगाट्रानसह सॅमसंग चालू आर्थिक
- वर्षात अॅप्पलसाठी ३७ हजार कोटी उत्पादनाचे लक्ष्य साध्य करेल.
अॅप्पल आणि सॅमसंग मेड इन इंडिया स्मार्टफोन्सची निर्यात
- देशातच मोठ्या प्रमाणावर मोबाईल फोनची निर्मिती करणे हा मुख्य उद्देश आहे.
- अॅप्पल आणि सॅमसंग हे मेड इन इंडिया स्मार्टफोन्सची निर्यातही करत आहेत.
- २०२१ मध्ये, अॅप्पलने ब्रिटनला २७ टक्के, जपानला २४, नेदरलँडला २३, जर्मनीला ०७, इटली आणि तुर्कीला प्रत्येकी चार आणि संयुक्त अरब अमिरातीला दोन टक्के आयफोन्स निर्यात केले.
- सॅमसंगने ज्या देशांमध्ये मेड इन इंडिया फोनची निर्यात केली आहे, त्यापैकी ४७ टक्के मोबाइल फोन संयुक्त अरब अमिरातीला, १२ रशियाला, सात दक्षिण आफ्रिकेला, पाच जर्मनीला, चार मोरोक्कोला आणि तीन टक्के ब्रिटनला निर्यात केले गेले.