अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम
ज्ञान हीच शक्ती असे मानले जाते, म्हणूनच माझ्यासारख्या प्रत्येक स्त्रीला जगातील प्रत्येक गोष्टीची माहिती असायलाच पाहिजे. अज्ञानाने आणि अपुऱ्या माहितीमुळेच अमरावतीच्या तरुणीवर कोरोना चाचणी दरम्यान लैंगिक अत्याचार झाला. या महिलेचे कोरोना चाचणीच्यावेळी टेक्निशियन अलकेशने घशाच्या स्लॅबसह तिच्या गुप्तांगातूनही स्वॅबचे नमुने घेतले. याप्रकरणामुळे सर्वच स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे. पण आज जर त्या महिलेला किंवा तिच्यासोबत गेलेल्या सहकारी मैत्रिणीला कोरोना चाचणी कशी केली जाते तसचं केली जात नाही. हे जर माहित असते तर तिने गुन्हाच घडू दिला नसता. रोखलं असतं. पण अज्ञानानं तिचा घात केला. त्या दोघींनी जर कोरोना चाचणी कशी करतात, काय असते ही सर्व माहिती घेतली असती, इतर काही आवश्यक माहिती ठेवली असती, थोडक्यात त्या ज्ञानवंत असत्या तर असं घडलंच नसतं. हा संपूर्ण प्रकार जसा त्या विकृताचा संताप येणारा आहे तसाच स्त्री म्हणून आमचीही कीव यावा असाच आहे.
हाती असलेल्या वेगवेगळ्या सत्तेचा दुरुपयोग करून असे नराधम विकृत कृत्य करतात. अगदी साध्या वॉचमन, लिफ्टमनपासून ते राजकीय सत्तेत बसलेल्यांपर्यंत सगळीकडे असे विकृत असू शकतात. अशा लोकांसाठीच आता महिलांनी सतर्क राहिले पाहिजे. सजग झालंच पाहिजे. आज हे लिहिण्याचं कारण हा विकृत गुन्हा, त्या विकृताला शिक्षा झाली म्हणजे झालं असं नाही. आपण याकडे अलर्ट कॉल म्हणून पाहिलं पाहिजे. आपण इतरांच्या खासगी जीवनात नको तेवढं नाक खुपसतो पण आपल्या सभोताली जे चाललं त्याविषयी मात्र उदासिन राहतो. त्यातूनच अनेकदा आपला गैरफायदा घेणं विकृतांना शक्य होतं.
महिलांनी जागं व्हावं असं अमरावतीतील प्रकरण
- हे संपूर्ण प्रकरण दीड वर्षाआधी घडलेलं आहे.
- पीडित २४ वर्षीय तरुणी अमरावती येथे भावाकडे राहत होती.
- ती नोकरी करत असलेल्या ठिकाणी तिचा सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.
- त्यामुळे २८ जुलै २०२० रोजी ती कोरोना चाचणीसाठी लॅबमध्ये गेली होती.
- अमरावतीच्या बडनेरा येथील मोदी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कोरोना चाचणी करालया गेला होती.
- तिच्याबरोबरच इतर २० जणांचीही चाचणी घेण्यात आली.
- टेक्निशियन असलेला ३० वर्षीय आरोपी अलकेश देशमुख याने तरुणीला परत बोलावले आणि तुमची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले.
- तुम्हाला युरिनल तपासणी करावी लागेल असे आरोपीने सांगताच तरुणीने तिच्या महिला सहकाऱ्याला कळवले.
- त्या दोघींनी महिला कर्मचारी नाहीत का, असेही विचारले.
- परंतु आरोपीने नकारार्थी मान दर्शवत सोबत महिला सहकाऱ्याला थांबू देण्याची परवानगी दिली.
- त्यानंतर तिच्या गुप्तांगातील स्वॅब तपासणी केली.
- त्यानंतर टेक्निशियनने तुमची टेस्ट निगेटिव्ह आल्याचे सांगितले.
अमरावतीची तरुणी नंतर तरी जागली, हिंमत दाखवली…तुम्हीही दाखवाच!
- योनीद्वारे घेतलेल्या स्वॅब तपासणीबाबत शंका आल्याने तरुणीने आपल्या भावाला याबाबत विचारलं.
- त्याने डॉक्टरांना विचारलं असता अशा प्रकारे चाचणी करत नसल्याचं त्यांनी सांगितलं.
- त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली.
- तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपी अलकेश विरुद्ध बडनेरा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.
- बडनेरा पोलिसांनी विविध कलमांसह अॅट्रोसिटी, आयटी कायद्याच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले.
- त्यानंतर अलकेशला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
- आता या प्रकरणी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून आरोपी अलकेश देशमुख याला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सजग, सतर्क आणि ज्ञानवंत व्हा!
प्रत्येक माणसाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने जीवन जगू शकतात. सध्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये वावरणाऱ्या माझ्या समवयीन मुलींना अनेक बाबतीत जरा जास्तच पुढे जायला आवडतं. हरकत नाही. जीवन कसं जगायचं हा प्रत्येकाचा स्वत:चा अधिकार! पण तसं जगताना त्यातील धोकेही आणि काळजी कशी घ्यावी, तेही लक्षात ठेवलं पाहिजे. काही मैत्रिणी सल्ला विचारतात. पण तोपर्यंत त्यांनी उशीर केलेला असतो. भावनेच्या भरात कसलीही काळजी न करता संबंध ठेवणं, कुणाशीही ठेवणं हे पतंगानं दिव्यावर झोकून देण्यासारखंच संकटात आणणारं आहे. पण अनेकदा यातील अनेक मैत्रिणींना काहीच माहिती नसते, असं त्या नंतर सांगतात. काही पुरुष मित्र अशांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन किंवा ते मांडत असलेलं चुकीचं आहे, असं भासवत मुद्दामही अडकवतात. जर या मैत्रिणींनी वाचनातून, इंटरनेटवरुन विश्वसनीय माध्यमांमधून योग्य माहिती ठेवली, तर अशी फसवणूक होणारच नाही. नंतर पश्चातापाची वेळच येणार नाही. त्यामुळे जीवन तुमच्या पद्धतीनं जगा पण जे कराल ते सजगतेनंच करा.
ज्ञान मिळवून महिलांनी सतर्कही झालं पाहिजे, आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या महिलांना ज्ञानाने आपली लढाई ही अधिक चांगली जिंकता येईल. या पीडितेच्याबाबतीत जे घडलं ते चुकीचंच घडलं. अशा नराधामांना शिक्षाही झालीच पाहिजे. पण अज्ञानामुळे आपल्यासारख्या महिला या सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या नराधमांच्या बळी ठरतात. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबर आहे. खांद्याला खांदा लावून त्या आज जगभरात आपलं नाव कमवत आहे. पण या प्रगतीचा, या नावाचा काय उपयोग जेव्हा आपल्याला आपल्या जीवनावर परिणाम घडवणाऱ्या गोष्टींची माहितीच नसेल.
त्यामुळे नव्या युगानुसार केवळ फॅशनसाठी आधुनिक होऊ नका. मोबाइलमधील सॉफ्टवेअर, अॅप जसे अपडेट करणे गरजेचे मानतो तसेच आपलं ज्ञानही सतत अपडेट करा. नवी माहिती ठेवाच ठेवा. काही वेळ त्यासाठी नक्कीच द्या. ज्ञान ही शक्ती आहेच. माहितीच्या रस्त्यावरही धोका असतोच, पण तुलनेनं कमी धोका होऊ शकतो, हे तत्व कायम लक्षात ठेवा.
(अपेक्षा सकपाळ ही मुक्तपीठ टीममधील पत्रकार आहेत. सतत माहिती मिळवत कोणत्याही राजकीय विचारांची बांधिलकी न पत्करता मोकळं लिहिणं, बोलणं तिला आवडतं.)
ट्विटर – @ApekshaSakpal4