मुक्तपीठ टीम
२०१२ पूर्वी शिक्षक सेवेत आहेत असे दाखवून हजारो शिक्षकांना सेवेत घेऊन शिक्षकभरती घोटाळा झाला. त्या घोटाळ्यात अण्णा हजारे यांनी लक्ष घालावे म्हणून आज राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची शिक्षण सामाजिक कार्यकर्ते अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांनी भेट घेतली व या घोटाळ्याची माहिती दिली. त्यावेळी अण्णांनी या प्रकरणी लक्ष घालून कार्यकर्त्यांशी चर्चा करून आंदोलनाविषयी ठरवणार असल्याचं सांगितलं.
शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ज्येष्ठ शैक्षणिक सामाजिक कार्यकर्ते अभ्यासक हेरंब कुलकर्णी आवाज उठवत आहेत. घोटाळेबाजांना अद्दल घडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ते सोमवारी अण्णा हजारेंना भेटले. या भेटीविोषयी मुक्तपीठला माहिती देताना ते म्हणाले, “अण्णांनी गुणवंत शिक्षक नाकारून घोटाळा केल्याबद्दल संताप व्यक्त केला व या विषयावर सर्व माहिती गोळा करून कार्यकर्ता बैठकीत हा विषय मांडला जाऊन या विषयावर आंदोलन करण्यात येईल असे सांगितले.”
अण्णा हजारे हे या विषयात लक्ष घालत आहेत ही अत्यन्त समाधानाची गोष्ट आहे, असेही हेरंब कुलकर्णी म्हणाले.
शासनाने २०१२ साली शिक्षकभरती बंद केली व TET परीक्षेद्वारे भरती होईल असे जाहीर केले. तरीपण संस्थाचालक यांनी शिक्षक भरती केली व हे शिक्षक २०१२ काम करत होते असे दाखवले व त्या शिक्षकांना TET तुन सूट मिळवली व अधिकाऱ्यांनी लाखो रुपये घेऊन मान्यता दिल्या. त्यातून गुणवंत शिक्षक नोकरीपासून डावलून संस्थाचालक व अधिकारी यांनी लाखो रुपये कमावले आहेत, त्याविरोधात आपला लढा सुरुच राहणार असल्याचेही हेरंबकुलकर्णी यांनी सांगितले.