मुक्तपीठ टीम
सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांमुळे राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब अत्यंत दु:खी झाले आहेत. कोरोनामुळे एसटी सद्य परिस्थितीत खडतर मार्गावरून प्रवास करीत असली तरी त्यावर मात करण्यासाठी आपले कसोशीने प्रयत्न सुरु आहेत. एसटीवर कितीही आर्थिक संकट ओढावले तरी कोणाचीही नोकरी जाणार नाही, याची एसटी महामंडळाचा कुटुंब प्रमुख म्हणून मी ग्वाही देतो. त्यामुळे कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून नका, असे आवाहन करीत उद्याच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर आत्महत्येच्या विचारांचे दहन करूया, अशी भावनिक साद मंत्री, ॲड. परब यांनी एसटीच्या कर्मचाऱ्यांना घातली आहे.
आर्थिक विवंचनेत असलेले एसटीचे कर्मचारी आत्महत्या करीत असल्याने परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनासारख्या महामारीच्या संकटाच्या वेळी जेव्हा संपुर्ण देश लॉकडाऊनमुळे बंद होता त्यावेळी आपण नेहमीप्रमाणे आपण आपले कर्तव्य बजावत होतात, या गोष्टीचे आम्ही सर्वच साक्षीदार आहोत आणि त्याची आम्हाला जाणीव आहे. आर्थिक संकट कितीही दाट असले तरी ते दुर होईल यांची मला खात्री आहे. पण कृपया आत्महत्येचा मार्ग पत्करु नका, असे ॲड. परब म्हणाले.
एसटी महामंडळ हे एक कुटुंब आहे. त्या कुटुंबाचा आपणही एक घटक आहात. सध्या आपली एसटीला गरज आहे. आपल्या या ऋणानुबंधनातून एसटी लवकरच भरारी घेईल. त्यातून परिस्थिती नक्कीच बदलेल. त्यामुळे आपण आत्महत्येसारख टोकाचं पाऊल उचलू नका. तुम्ही सर्वच आमच्यासाठी अनमोल आहात, असे हृदयस्पर्शी भावना त्यांनी व्यक्त केल्या. विजयादशमीच्या निमित्ताने आत्महत्येच्या विचारांचे दहन करूया व एसटीच्या प्रगतीपथाचा आलेख उंचावण्याचा संकल्प करूया, असे आवाहन करतानाच मंत्री, ॲड. अनिल परब यांनी एसटीच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना विजयादशमीच्या व येणाऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. विजयादशमीच्या मुहूर्तावर आत्महत्येच्या विचारांचे दहन करूया!