मुक्तपीठ टीम
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक आणि सदोष मतदार याद्याबाबत आरटीआय कार्यकर्ते आणि आजीव सभासद अनिल गलगली यांनी केलेल्या तक्रारी नंतर आता मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाला जाग आली. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या प्रमुख कार्यवाह यांनी मतदार याद्या अद्ययावत करणे बाबतीत एक परिपत्रक जारी केले आहे.
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या प्रमुख कार्यवाह यांनी मतदार याद्या अद्ययावत करणे बाबतीत ९ नोव्हेंबर २०२१ रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची २०२१-२०२६ ची निवडणूक नुकतीच पार पडली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त, साधारण सभा सदस्य, कार्यकारी मंडळ सभा सदस्य,कार्यकारी मंडळ सभा पदाधिकारीयांची अद्ययावत यादी पाठविण्यात आली आहे. अशीच अद्ययावता सर्व शाखा आणि विभागातील सभासदांच्या बाबतीत ठेवायची आहे. यास्तव शाखेत पुस्तक देव-घेव करणाऱ्या सभासदांकडून त्यांची स्वसाक्षांकित आधार कार्डाची प्रत स्वीकारुन अद्ययावत यादीत नाव समाविष्ट करावे. न येणाऱ्या सभासदांना टपालाद्वारे स्वसाक्षांकित आधार कार्डाच्या प्रतिसहित उपस्थित राहण्याचे आवाहन करावे.
अनिल गलगली यांच्या मते ज्याअर्थी आवाहन करण्यात आले आहे त्याअर्थी मतदार याद्या सदोष होत्या आणि निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मृतकांची नावे मतदार यादीत असूनही निवडणूक अधिकारी यांनी अप्रत्यक्षपणे अनियमितता आणि चुकीच्या प्रक्रियेला चालना दिली आहे. अनिल गलगली यांनी धर्मादाय आयुक्तांना पत्र पाठवून मागणी केली आहे की निवडणूक निकाल रद्द करत सदोष असलेल्या मतदार याद्या अद्ययावत करत पुन्हा निवडणूक घेण्यात यावी.