मुक्तपीठ टीम
विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मनसुख हिरन प्रकरणावरुन राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न करत असतानाच राज्य सरकारनंही विरोधकांवर पलटवार केला आहे. दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची घोषणाही गृहमंत्री अनिल देशमुखांनी केली आहे.
खासदार डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात दादरा नगर हवेलीचे प्रशासक आणि गुजरातचे माजी गृहमंत्री प्रफुल्ल खेडा पटेल यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांची नावे घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे या चौकशीच्या माध्यमातून आघाडी सरकार भाजपाच्या अंबानी स्फोटकप्रकरणातील आक्रमकतेला तसेच उत्तर देत असल्याचे मानले जात आहे.
मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. मरीन लाईन्स चौपाटी येथील सी ग्रीन हॉटेलमधील रूममध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली आहे. ही नोट सुमारे १५ पानांची आहे. यात त्यांनी आपण मुंबईत आत्महत्या करतोय, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र सरकारवर माझा विश्वास आहे. त्यामुळे मी महाराष्ट्रात आत्महत्या करत असल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख असल्याचंही गृहमंत्री देशमुखांनी सांगितलं. त्यावरुन डेलकर यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी होत होती. त्यानंतर आज अनिल देशमुख यांनी डेलकर यांच्या मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन करणार असल्याचं म्हटलं आहे.
‘दादर नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर हे सात वेळा खासदार होते. सात वेळा खासदार राहिलेला व्यक्ती आत्महत्या करतो. तेही मुंबईत येऊन. त्यांनी सुसाईड नोटमध्ये सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्यात त्यांनी दादर नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल खेडा पटेल यांचं नाव घेतलेलं आहे. खेडा पटेल आणि इतर अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात होता. वारंवार अडचणी निर्माण केल्या जात होत्या, असं डेलकर यांनी सुसाइड नोटमध्ये लिहलं असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. तसंच, डेलकर यांच्या पत्नी व मुलगा यांनीही आपल्याला पत्र लिहत चौकशीची विनंती केली आहे,’ असंही यावेळी गृहमंत्र्यांनी नमूद केलं.
मोहन डेलकर कोण आहेत?
- मोहन डेलकर हे १९८९ मध्ये दादरा आणि नगर लोकसभा क्षेत्रातून खासदार म्हणून निवडून आले होते.
- आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांनी कामगार नेते म्हणून केली होती.
- ते काँग्रेस आणि भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भारतीय नवशक्ती पार्टी (बीएनपी) ची स्थापना केली होती.
- मोहन डेलकर यांनी तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली होती.
- २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणूकीत ते निवडून आले होते.