मुक्तपीठ टीम
सुल्ली डील्सनंतर आता बुल्ली बाई, या अॅपने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या अॅपला बुल्ली बाई (#BulliBai) या हॅश टॅगच्या नावाने ट्रोल केले जात आहे. तसेच या अॅपमुळे मुस्लिम महिलांमध्ये संताप पसरला आहे. या अॅपबाबत राजकीय वादही सुरू झाले असून प्रकरण पोलिसांच्या तपासापर्यंत पोहोचले आहे. अशा स्थितीत प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे की, ही सुल्ली डील्स आणि बुल्ली बाई म्हणजे काय?
मुस्लिम महिलांच्या संतापाचे कारण?
- बुल्ली बाई अॅपमुळे मुस्लिम महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
- अॅपचे निर्माते बेकायदेशीरपणे विविध सोशल मीडिया अकाउंटवरून मुस्लिम महिलांची छायाचित्रे गोळा करतात आणि त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहून त्यांची छायाचित्रे ट्रोल करतात.
- यावर फोटो चुकीच्या पद्धतीने वापरले जात आहेत. अॅपवर अनेक महिलांची छायाचित्रे आहेत, ज्यावर एका महिलेच्या छायाचित्रासह लिहिले आहे, ‘यु आर बुल्ली बाई ऑफ द डे’…. ही छायाचित्रे शेअरही होत आहेत.
सुल्ली डील काय आहे?
- सु्ल्ली हा महिलांबद्दल वापरला जाणारा अपमानास्पद शब्द आहे.
- ४ जुलै २०२१ रोजी ट्विटरवर सुल्ली डील्सच्या नावाने अनेक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आले.
- अॅपवर ‘सुल्ली डील ऑफ द डे’ अशी टॅग लाइन होती आणि ती मुस्लिम महिलांच्या फोटोंसोबत शेअर केली जात होती. विशेष गोष्ट अशी की, ती गिटहबवर एका अज्ञात ग्रुपने तयार केली होती.
बुल्लीबाई हे नाव कोणत्या प्रकरणातून पुढे आले?
- मुस्लीम महिलांच्या छायाचित्रांवरही सुल्ली डील्स होत आहेत, मात्र एका महिला पत्रकाराला लक्ष्य केल्यावर हे अॅप जगासमोर आले.
- बेकायदेशीर मार्गांचा वापर करून अॅपवर त्यांचे फोटोही ट्रोल केले जात होते.
- याबाबत माहिती देताना या महिला पत्रकाराने ट्विटरवर लिहिले की, मुस्लिम महिलांना नवीन वर्षाची सुरुवात भीती आणि द्वेषाच्या भावनेने करावी लागते.
- यानंतर शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सांगितले की, गिटहब या होस्टिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून शेकडो मुस्लिम महिलांचे फोटो अॅपवर अपलोड करण्यात आले आहेत.
- त्यांनी हा मुद्दा मुंबई पोलिसांकडे मांडला आणि दोषींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली.
- त्या म्हणाल्या, “मी माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव जी यांना अनेक वेळा ‘सुल्ली डील्स’ सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे महिलांना लक्ष्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे.”
अॅप तयार करण्यासाठी गिटहबचा गैरवापर
- ‘बुली बाई’ अॅप गिटहब वर तयार करण्यात आला आहे.
- हे एक होस्टिंग प्लॅटफॉर्म आहे जेथे ओपन सोर्स कोड आहे, परंतु आता गिटहब आणि त्यावर तयार केल्या जात असलेल्या अॅप्सबद्दल लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
गिटहबने यूजर्संना केले ब्लॉक
माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, अॅप यूजर्सकडून धमकावणाऱ्याला गिटहबने ब्लॉक केले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ते म्हणाले की, गिटहबलाच रविवारी युजरला ब्लॉक करण्याची सूचना देण्यात आली आहे.