सुश्रुषा जाधव / मुक्तपीठ टीम
मुंबईतील गणेशोत्सवातील दहा दिवसांच्या गणपतींचं विसर्जन झालं असलं तरी गणेशोत्सव अद्याप संपलेला नाही. काही ठिकाणी २१ दिवसांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो. तर अंधेरीचा राजा म्हणून ख्यातनाम असणाऱ्या आझाद नगर सार्वजनिक गणेशोत्सवातील बाप्पाचं विसर्जन संकष्टी चतुर्थीला करण्याची परंपरा आहे.
मुंबईच्या अंधेरी उपनगरातील आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीचा उत्सवातील गणरायाला अंधेरीचा राजा म्हणून ओळखलं जातं. या गणपतीची ख्याती ही वेगळीच. त्याचं कारण याचं विसर्जन अनंत चतुर्दशीला होत नाही. ते होते संकष्टी चतुर्थीला. कदाचित त्या दिवशी गावाला जाणारा हा एकमेव गणपती बाप्पा असावा.
या वर्षी बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसचा देखावा!
या वर्षी समितीने गुजरातमधील बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसचा देखावा साकारला आहे. हा पॅलेस बडोदरा राज्यावर राज्य करणारे एक प्रमुख मराठा कुटुंब गायकवाड राजघराण्याचा आहे. लक्ष्मी विलास पॅलेस जगातील सर्वात मोठ्या राजवाड्यांपैकी एक आहे.
कामगारांना पावणारा बाप्पा…झाला अवघ्या अंधेरीचा राजा!
या वर्षी आझादनगर गणेशोत्सव उत्सव समितीने ५६ वर्षे पूर्ण केली आहेत. आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीची स्थापना ५७ वर्षांपूर्वी १९६६ मध्ये गोल्डन टोबॅको कंपनी, टाटा स्पेशल स्टील आणि एक्सेल इंडस्ट्रीज लि.च्या कामगारांनी केली होती. ही लोक लालबागमधून उपगनरात आली. त्यांच्या कारखान्यांपासून काही अंतरावर त्यांना आझाद नगर म्हाडा वसाहतीत स्थायिक करण्यात आले. एम.के. मेनन, तुकाराम साळसकर, वासुदेव कसालकर इत्यादी संस्थापक सदस्य होते ज्यांनी हा गणेशोत्सव सुरू केला.
परंपरा संकष्टीला विसर्जनाची…
पूर्वी श्री गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी लहान मूर्तीसह केले जात असे. ही गोष्ट १९७५ पर्यंतची. एकदा या समितीचे भक्त काम करत असलेल्या एका कंपनीत दीर्घकाळ संप झाला. संपाच्या अनुकूल परिणाम लाभण्यासाठी त्यांनी या गणरायाला साकडं घातलं. त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि वचन दिल्याप्रमाणे अनंत चतुर्दशीनंतर ५ दिवसांनी येणाऱ्या संकष्टी चतु्र्थीला मूर्तींचे विसर्जन सुरू केले. समितीचे तत्कालीन अध्यक्ष आप्पा खानविलकर यांची कामगार हिताची इच्छा या अंधेरीच्या राजाने पूर्ण केली. तेव्हापासून त्या गणपतीवरील भक्तांची श्रद्धा अधिकच वाढली. पुढच्या काळात अंधेरीभर पसरलेल्या ख्यातीमुळे, त्याच्या राजेशाही स्वागत आणि निरोपामुळे ‘अंधेरीचा राजा’ म्हणून संबोधण्यास सुरुवात झाली.
अंधेरीभरातून मिरवणूक
अंधेरीतील भक्तांच्या मागणीनुसार संपूर्ण अंधेरी पश्चिम भागातून विसर्जन मिरवणूक काढली जाते. मिरवणूक साधारणपणे संध्याकाळी ५ वाजता सुरू होते. अंधेरी वीरा देसाई ते आंबोली ते आंबोली नाका ते अंधेरी मार्केट ते जयप्रकाश मार्ग ते अपना बाजार – डीएन नगर – चार बंगला – सातबंगला – यारी रोड अशा मार्गाने दुसऱ्या दिवशी सकाळी वेसावे समुद्रकिनारी पोहोचते.
विशेष म्हणजे अंधेरीच्या राजाच्या मिरवणूक मार्गात सर्वभाषिक, सर्वधर्मीय भक्त रोषणाई करतात. फुलांच्या माळा लावतात. राजकीय भेद विसरत मंच उभारून स्वागत करतात. रस्त्याच्या दुतर्फा भक्तांच्या रांगा स्वागतासाठी उत्सुक असता. अशी शिस्तबद्ध आणि शानदार मिरवणूक होणे नाही!
पूजेला लावलेली छोट्या मूर्तीचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जिन केले जाते. तर मोठ्या मूर्तीचे विसर्जन संकष्टी चतुर्थीला केले जाते.
आझाद नगर सार्वजनिक उत्सव मंडळाच्या कार्यात प्रमुख मार्गदर्शक यशोधर (शैलेश) पद्माकर फणसे, अध्यक्ष केशव तोंडवळकर, कार्याध्यक्ष महेंद्र धाडिया, उपविभाग अध्यक्ष मनोज कसालकर, एम.के. मेनन, हेमंत ठाकूर, सचिव विजय सावंत, सहसचिव अशोक राणे, सईदा पटेल, आप्पा पोवळे, कोषाध्यक्ष सुबोध चिटणीस, सह कोषाध्यक्ष सचिन नायक, रोहन पोवळे, नरेश बैनाला, चार्टर्ड अकाउंटंट अजित ठक्कर आणि कंपनी, सल्लागार : नितीन रेगे, विलास सापळे, तुकाराम साळसकर, आणि महादेव सिलोटे यांचा सहभाग आहे.