मुक्तपीठ टीम
मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ६ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. आता या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे. भाजपाकडून मुरजी पटेल हे उमेदवार असणार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील बंडानंतरची ही पहिली निवडणूक एकप्रकारे जनमत चाचणी मानली जात आहे.
असा असणार निवडणूक कार्यक्रम-
- केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
- येत्या ३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
- तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे.
- १४ ऑक्टोबरही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
- १५ ऑक्टोबर रोजी अर्ज छाननी होणार आहे.
- तर १७ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे, असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.
शिवसेना आणि भाजपा-शिंदे गटात चुरशीची लढत
- अंधेरी पोटनिवडणूक ही शिवसेनेतील बंडखोरीनंतर पहिली मोठी निवडणूक आहे.
- या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपा-शिंदेगट युती यांच्या बळाची परीक्षा आहे.
- खरंतर शिवसेनेने २०१९मध्ये ही जागा जिंकल्याने तिथे शिंदे गटाचा उमेदवार अपेक्षित होता. पण भाजपाने या जागेवर उमेदवार दिला आहे.
- त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवार ऋजुता रमेश लटके आणि भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात लढत होईल.
- रमेश लटके यांच्या पत्नी ऋजुता रमेश लटके यांना मतदारांमधील सहानुभुतीचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.
- तसंच शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अंधेरीत बंडानंतर न झालेली फाटाफूट त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
- त्यांच्यासाठी अर्थबळ कोण उभे करेल, ही त्यांच्या लढण्यातील महत्वाची समस्या ठरणार आहे. तसेच चिन्हाचा वादही नेमकं कोणतं वळण घेतो, तेही महत्वाचं असेल.
- दुसरीकडे शिवसेनेतील बंडखोरी आणि मुरजी पटेलांचं अर्थबळ आणि त्यातून जनसंपर्क ही भाजपासाठी जमेची बाजू आहे.
- मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नीचे जातीच्या दाखल्याचे प्रकरण, ते मुळचे भाजपा संस्कृतीतील नसणं या बाबी भाजपासाठी समस्या ठरू शकतात.
अर्थात राजकारणात अशक्य काही नसतं. त्यामुळे नेमकं ३ नोव्हेंबरला अंधेरीकर मतदार काय करतील, कोणतं बटन दाबतील ते आताच सांगता येणार नाही. पण गेल्या दोन पोटनिवडणुकांमध्ये सहानुभुतीची मते विजयाचे शिल्पकार ठरली होती. त्यामुळे आता सहानुभुतीची मते शिवसेनेच्या विजयाचा भगवा फडकवतात की भाजपा शिंदे गटाच्या मदतीनं आपलं कमळ फुलवते, हे ६ नोव्हेंबरला स्पष्ट होईल.