मुक्तपीठ टीम
दादाभाई नौरोजी नगर म्हणजेच सध्याच्या बोलीभाषेत डी. एन. नगर. पूर्वीची कामगार वस्ती आता मध्यमवर्गीयांची झाली आहे. उत्सवांमधील उत्साह मात्र आजही तसाच कायम आहे. डी. एन. नगर सार्वजनिक गणेशोत्सवाचा झगमगाट लक्ष वेधून घेणाराच!
प्रवेशापासून रोषणाईनं डोळे दिपतात. आतमध्ये गणरायासाठी उभारलेले आकर्षक नक्षीदार स्तंभ. चित्रांनी सजलेल्या भिंती. छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळकांना अभिवादन करण्यासाठी आवर्जून तेही मंडपात आहेत.
मंडळाकडून दरवर्षी गणेश मुर्तीला वेगवेगळी आकर्षक सजावट करण्याची परंपरा आहे. यावेळी विराजमान गणपती बाप्पाचा थाट काही वेगळाच आहे. गणपती बाप्पाला आणखी काही मौल्यवान वस्तूंनी हिऱ्यांनी सजवण्यात आले आहे. कोरीव आणि नक्षीदार पद्धतीने गणेश मूर्तींची सजावट करण्याची मंडळाची परंपरा यावर्षीही कायम आहे.
हे मंडळ दरवर्षी धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करते. हे वर्ष तर दोन वर्षांच्या ब्रेकनंतरचं असल्यानं उत्साह अधिकच आहे. त्याचबरोबर मंडळातर्फे सामाजिक कार्यही मोठ्या प्रमाणार केलं जातं. सामाजिक कार्यातील सक्रियता हे मंडळाच्या उत्सवाचं एक खास वैशिष्ट्यच मानलं जातं.
मेट्रोने प्रवास करताना डी.एन. मेट्रो स्थानकावर उतरलात तर बाप्पाचं दर्शन नक्कीच घ्या!